मात्र आर्थिक विवंचनेमुळे हतबल
श्याम पांडे
दारव्हा,
‘Mane’ Sisters of Darwha ‘मुलींनी चूल मूल सांभाळावं’, हा विचार मोडीत काढत देशाचे नाव उंच करणाèया ‘फोगट’ बहिणींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पुन्हा एकदा इतिहास रचण्याची तयारी करणाèया यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील ‘माने’ भगिनी कुस्तीच्या मैदानात डावपेच रंगवत आहेत. मात्र आर्थिक परिस्थितीच्या विळख्यामुळे त्यांच्या स्वप्नांना खीळ बसली आहे.
दारव्हा तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंंबातील कुस्तीपटू माने भगिनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कठोर मेहनत घेऊन कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहेत. त्या महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासोबत ऑलिंपिक स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व करून ‘फोगट’ भगिनींप्रमाणे सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. मात्र कुटुंंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना योग्य आहार, आधुनिक प्रशिक्षण, व्यायाम साहित्य, शिष्यवृत्ती, कुस्ती सरावासाठी आवश्यक सुविधा, शैक्षणिक सुविधा, तांत्रिकदृष्ट्या कुस्तीचे प्रशिक्षण मिळवण्यात अडचणी येत आहेत.
‘Mane’ Sisters of Darwha आर्थिक विवंचनेमुळे त्यांना प्रशिक्षक तसेच स्पर्धांसाठी लागणारा खर्च भागविणे कठीण झाले आहे. मात्र भूमिका वासुदेव माने (वय 20), देवयानी वासुदेव माने (वय 17), ऐश्वर्या वासुदेव माने (वय 11) व खुशी वासुदेव माने (वय 9) यांनी कुस्तीच्या सरावात खंड पडू दिलेला नाही. या संदर्भात धनगर समाजातील अधिकारी व कर्मचारी तसेच दारव्ह्यातील विविध क्रीडा मंडळाच्या पदाधिकाèयांनी निवेदन देत मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांना माने भगिनींच्या प्रशिक्षणासाठी आर्थिक सहकार्य करण्याची मागणी केली आहे. यावेळी मुकेश चुडे, विशाल झाडे, संतोष शेंडगे, राजेंद्र चिंतकुटलावार, विजय काळे, संकल्प क्रीडा मंडळाचे लक्ष्मण नवरंगे, चैतन्य ग्रुपचे गणेश भोयर, डॉ. गोपाल अग्रवाल, अनिल लाभसेटवार, अशफाक अली, गफूर शेख तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
शासनाच्या क्रीडा योजना
माने भगिनींसाठी योग्य प्रशिक्षक, आधुनिक व्यायाम साहित्य, क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्या. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा योजनांमधून विशेष प्राधान्य देण्यात यावे. त्यांच्या आहारासाठी आवश्यक निधी व मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सहकार्य मिळाल्यास साध्य
मी स्वतः एक कुस्तीपटू असून मला कुस्तीची आवड आहे. मला चार मुली आहेत. त्यांचे कुस्तीमध्ये उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते साध्य करू शकत नाही. या स्वप्न पूर्णत्वासाठी संजय राठोड व क्रीडाप्रेमींनी सहकार्य केल्यास मी केलेला संकल्प पूर्ण होऊ शकतो.
- वासुदेव माने
माने भगिनींचे वडील