जम्मू,
Massive Fire at Madrasa in Anantnag जम्मू आणि काश्मीर मधील अनंतनाग येथे एका मदरशात लागलेल्या भीषण आगीत १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर तीन मुले गंभीर भाजल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर वेढल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोर्ट रोड परिसरातील फैजान बाबा हैदर ऋषी दारुल उलूममध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. त्या वेळी मदरशातील विद्यार्थी गाढ झोपेत होते. काही क्षणांतच आगीने संपूर्ण इमारतीला वेढा दिला आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
या दुर्घटनेत चार विद्यार्थी भाजले होते. त्यापैकी बिलाल अहमद या १२ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. उर्वरित तिघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, पोलिस आणि अग्निशमन विभागाने आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याचदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये खाण क्षेत्राशी संबंधित एक मोठी घडामोडही समोर आली आहे. केंद्र सरकारच्या खाण मंत्रालयाकडून श्रीनगर येथे चुनखडीच्या १२ ब्लॉक्सच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. अनंतनाग, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांतील हे ब्लॉक्स सिमेंट, बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. या लिलावामुळे प्रदेशातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.