वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गैरप्रकारांवर अभाविपचा संताप

    दिनांक :12-May-2026
Total Views |
- दोषींवर कठोर कारवाईची मागणी

नागपूर, 
Medical Entrance Examination वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा रद्द करून संपूर्ण प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्याच्या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून स्वागत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि परीक्षेतील कथित गैरप्रकारांचे सत्य समोर यावे, यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले.
 
 
medical
विद्यार्थी परिषदेने सुरुवातीपासूनच या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. तपासादरम्यान समोर येणारी माहिती, पुरावे आणि गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे सार्वजनिक करण्यात यावीत, अशी मागणीही परिषदेकडून करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये सक्रिय असलेल्या भ्रष्ट जाळ्याचा संपूर्ण पर्दाफाश होणे आवश्यक असल्याचे मत परिषदेकडून व्यक्त करण्यात आले.
परीक्षेतील अनियमिततांमुळे राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे परिषदेकडून नमूद करण्यात आले. वर्षभर मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या अशा घटना अत्यंत दुर्दैवी असून, यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याचेही परिषदेकडून सांगण्यात आले.
Medical Entrance Examination  संस्थेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, तसेच परीक्षा व्यवस्थेची रचना आणि कार्यपद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यात यावा, अशी मागणी परिषदेकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी पारदर्शक, विश्वासार्ह आणि निष्पक्ष परीक्षा प्रणाली उभारणे अत्यावश्यक असल्याचे परिषदेने स्पष्ट केले.