प्रलंबित प्रश्नांवर खासदारांचे जलसमाधी आंदोलन 15 रोजी

खासदारांची माहिती

    दिनांक :12-May-2026
Total Views |
भंडारा,
jalsamadhi-protest : जिल्ह्याातील सामान्य जनतेच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार, 15 रोजी कारधा येथे 'जलसमाधी आंदोलन' केले जाणार असल्याचे खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी सांगितले.
 
 
jkl
 
 
 
या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. आज जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण आणि महिला अनेक गंभीर समस्यांशी झुंज देत आहेत. वारंवार निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसल्याने आता रस्त्यावर उतरण्या शिवाय पर्याय उरलेला नाही. ही लढाई केवळ एका पक्षाची नसून, सामान्य जनतेच्या अस्तित्वाची आणि मुलांच्या भविष्याची आहे. जिल्ह्यातील तरुण पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याबद्दल खासदारांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ही तस्करी रोखण्यात शासन आणि पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्ध्वस्त होत असलेली कुटुंबे वाचवण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
धान बोनसमध्ये वाढ करण्यात यावी, शेतकऱ्यांना दिवसा १६ तास वीजपुरवठा मिळावा, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावे, जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना असावा, जिल्ह्यातील वाढलेली बेरोजगारी दूर करून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा अनेक मागण्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी केल्या आहेत.
 
 
या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, जि.प. अध्यकक्षा कविता उईके, सभापती शितल राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 15 रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या आंदोलनात जिल्ह्यातील नागरिकांनी पक्षभेद विसरून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केले आहे.