- लक्ष्मीभूवन चाैकातील थरारक घटना
अनिल कांबळे
नागपूर,
Murder Case at Laxmibhuvan Square तीन युवक आईसगाेळा खाण्यासाठी दुचाकीने लाॅ काॅलेज चाैकात आले. ठेल्याजवळ आपली दुचाकी उभी करुन गप्पा करीत असलेल्या दाेन युवकांच्या अगदी पायाजवळ त्या युवकांनी दुचाकी पार्क केली. त्यामुळे दाेघांनी त्यांच्याकडे बघितले. ‘क्याें बे...तू क्या देख रहा हैं’ असे म्हणून तीनही युवकांनी वाद घातला. त्या दाेन्ही युवकांनी तिघापैकी एकावर चाकूने हल्ला करीत जागीच ठार केले आणि पळ काढला. ही घटना साेमवारी पहाटे अडीच वाजता घडली. तुषार सुधीर चुटे (वय 20) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार हा गायकवाड पाटील इंजिनिअरिंग काॅलेजचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी हाेता. त्याचे वडील सुधीर चुटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 10 मे 2026 राेजी सायंकाळी सुमारे 6 वाजता तुषार घराबाहेर गेला हाेता. ताे नेहमीप्रमाणे मित्रांसाेबत बाहेर गेला असल्याने कुटुंबीयांनी विशेष लक्ष दिले नाही. मात्र, रात्री उशिरापर्यंत ताे घरी परतला नाही. 11 मे राेजी पहाटे सुमारे 4 वाजता तुषारचे काही मित्र त्यांच्या घरी पाेहाेचले आणि तुषारला गंभीर अवस्थेत मेयाे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. ही बातमी ऐकताच कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालय गाठले. तेथे उपस्थित असलेल्या आर्यन आणि राज या मित्रांनी संपूर्ण प्रकार सांगितला.
Murder Case at Laxmibhuvan Square मित्रांच्या माहितीनुसार, तुषार हा दाेन मित्रांसह ट्रीपलसीट रविवारी रात्री सुमारे 2.30 वाजता गाेकुळपेठ परिसरातील आइसगाेळा दुकानावर गेले हाेते. तेथे रस्त्याच्या कडेला आराेपी दाेन युवक उभे हाेते. त्यांच्या पायाजवळ तुषारने दुचाकी उभी केली. त्यामुळे ते दाेघेही दचकले आणि ते तुषारकडे बघू लागले. तुषारने दाेघांनाही शिवीगाळ करुन तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तुषारने एका युवकाला थापड मारली. त्यामुळे चिडलेल्या दाेघांनीही तुषारवर चाकूने हल्ला केला.
मित्रांनी काढला पळ
तुषारने दाेन मित्रांना आईस गाेळा खायला नेले हाेते. मात्र, तुषारला मार खाताना बघून दाेन्ही मित्रांनी तेथून पळ काढला आणि अंधारात लपून बसले. दाेन्ही मित्र पळाल्यामुळे चिडलेल्या आराेपींनी तुषारचा जागीच खून केला आणि पळून गेले. दाेन्ही आराेपींना अंबाझरी पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. दाेघेही बाराव्या वर्गाचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे.