राष्ट्रवादीत 'पार्थ' पर्वाची सुरुवात? नव्या यादीतून ज्येष्ठ नेत्यांची सुट्टी!

    दिनांक :12-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ncp-new-national-executive : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत रचनेत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल पाहायला मिळत असून, पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला २९ एप्रिल २०२६ रोजी सादर केलेल्या नवीन यादीनुसार, पक्षाने आपल्या स्थापनेपासून सोबत असलेल्या दिग्गज नेत्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या मातब्बर नावांचा समावेश नसल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषतः प्रफुल्ल पटेल यांनी २५ वर्षांहून अधिक काळ पक्षाची राष्ट्रीय धुरा सांभाळली होती आणि अजित पवार यांच्या बंडावेळी ते सर्वात खंबीर आधार मानले जात होते. अशा विश्वासू नेत्याला बाजूला सारल्यामुळे पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
 

NCP 
 
 
या नव्या रचनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सत्तेचे संपूर्ण 'कौटुंबिक' केंद्रीकरण. पक्षाची सर्व महत्त्वाची पदे आता थेट पवार कुटुंबाच्या हातात सोपवण्यात आली आहेत. सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाने महिला नेतृत्वाचा चेहरा पुढे केला असला, तरी त्यांच्यासोबतच पार्थ पवार यांची राष्ट्रीय सरचिटणीस आणि जय पवार यांची राष्ट्रीय सचिव म्हणून झालेली निवड बरंच काही सांगून जाते. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांकडे पक्षाची सर्वोच्च सूत्रे गेल्यामुळे, "ज्या घराणेशाहीवर टीका झाली, तीच पक्षात अधिक घट्ट झाली आहे का?" असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आणि जुन्या फळीतील नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
केवळ अनुभवी नेत्यांना वगळणेच नव्हे, तर या यादीत काही अगदी नवीन आणि अपरिचित चेहऱ्यांची वर्णी लावून पक्षाने आपली रणनीती पूर्णपणे बदलल्याचे संकेत दिले आहेत. धनंजय शर्मा, राणा रणवीर सिंग, डॉ. रमण प्रीत सिंग आणि डॉ. अभिषेक बोके यांसारख्या नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. या नव्या नियुक्त्यांमध्ये पार्थ पवार यांचा मोठा प्रभाव जाणवत असून, पक्ष आता तरुण आणि नव्या दमाच्या नेतृत्वाकडे झुकत असल्याचे दिसते. मात्र, ज्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष उभा करण्यासाठी रक्त सांडले, त्यांना अशा प्रकारे डच्चू दिल्याने येणाऱ्या काळात पक्षात अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.