नीट परीक्षेसाठी विद्यार्थी ‘पुन्हा त्याच रणांगणात'

    दिनांक :12-May-2026
Total Views |
- वैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द
- कडक नियमांनंतरही गैरप्रकार

नागपूर, 
NEET Exam वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न डोळ्यांत साठवत प्रखर उन्हात परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट आले आहे. कथित पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने 'नीट' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतल्याने नागपुरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

NEET Exam 
 
३ मे रोजी नागपुरासह देशातील विविध शहरांमध्ये ही परीक्षा पार पडली होती. शहरातील ६४ केंद्रांवर १० ते १२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कठोर नियम, तपासणी आणि उष्णतेच्या तडाख्यात विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली होती. मात्र पेपरफुटीच्या आरोपांनंतर अखेर परीक्षा रद्द करण्यात आली.
या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा तयारी करून परीक्षा द्यावी लागणार आहे. विशेषतः बाहेरगावाहून नागपुरात आलेल्या विद्यार्थ्यांवर राहणी, अन्न आणि शिक्षणाचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. पालकांनाही मानसिक आणि आर्थिक ताणाचा सामना करावा लागत आहे.
NEET Exam  राष्ट्रीय परीक्षा संस्थेने स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. नवीन परीक्षा वेळापत्रक आणि प्रवेशपत्रे लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेवरही या निर्णयाचा परिणाम होणार असून प्रवेश प्रक्रियेला मोठा विलंब होण्याची शक्यता आहे.

“विद्यार्थ्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना पुन्हा मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागणार आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थापनाने अधिक कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
- डॉ. जागेश्वर केचे, परीक्षा केंद्र प्रमुख
----------
“दोन वर्ष मेहनत केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा धक्का मोठा आहे. पुन्हा अभ्यासाच्या तणावात जाणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.”
- हेमंत बोन्डे, नीट परीक्षा पर्यवेक्षक
---------
“आता होणारी परीक्षा तरी पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त होईल का, हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.”
- साक्षी वैद्य, विद्यार्थिनी
--------
“कडक नियम पाळूनही पेपरफुटी झाली, ही गंभीर बाब आहे. मुलांना पुन्हा उन्हात परीक्षा द्यावी लागणार असल्याने चिंता वाढली आहे.”
- परिणीती पवार, पालक