नवी दिल्ली,
NEET UG 2026 Exam Cancelled देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ३ मे रोजी होणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे रद्द करण्यात आली असून, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे. एनटीएने जारी केलेल्या निवेदनानुसार, तपास यंत्रणांकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालांमध्ये परीक्षा प्रक्रियेशी संबंधित गंभीर अनियमितता समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा पूर्ववत घेणे योग्य ठरणार नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रणालीवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि पारदर्शकता जपण्यासाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एजन्सीने स्पष्ट केले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण विभाग कडे सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकारने सखोल तपासाचे आदेश दिल्यानंतर एनटीएने तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. आवश्यक कागदपत्रे, परीक्षा नोंदी आणि संबंधित माहिती तपास अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.दरम्यान, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. एनटीएने मान्य केले की, फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात मानसिक आणि शैक्षणिक ताण सहन करावा लागू शकतो. मात्र, देशातील परीक्षा प्रणालीची विश्वासार्हता टिकवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे एजन्सीने स्पष्ट केले.
एनटीएने आणखी एक महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, मे २०२६ सत्रासाठी झालेली नोंदणी, विद्यार्थ्यांची माहिती आणि निवडलेली परीक्षा केंद्रे फेरपरीक्षेसाठी वैध राहतील. उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. यापूर्वी भरलेले परीक्षा शुल्क परत करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.विद्यार्थी आणि पालकांनी केवळ एनटीएच्या अधिकृत माध्यमांवरूनच माहिती घ्यावी आणि सोशल मीडियावरील अप्रमाणित दाव्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.