देहराडून,
neet-ug-2026-paper-leak-case : NEET UG-2026 पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपला (SOG) मोठे यश मिळाले असून, बराच काळ फरार असलेल्या आरोपीला उत्तराखंडमधील देहराडून येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी आपल्या एका मित्राच्या घरी लपून बसला होता, ज्याला पोलिसांनी ९ मे रोजीच बेड्या ठोकल्या होत्या. ३ मे रोजी पार पडलेल्या नीट परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सॲपवर एक 'गेस पेपर' मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या पेपरमधील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याने देशात एकच खळबळ उडाली होती, ज्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सौजन्य: एआय फोटो
या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी राजस्थान एसओजीने अनेक राज्यांमध्ये छापेमारी सुरू केली आहे. तपासादरम्यान असे समोर आले आहे की, सुमारे ४०० हून अधिक प्रश्नांचा एक संच परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला होता, ज्याचे धागेदोरे एका मोठ्या संघटित टोळीशी जोडलेले असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आतापर्यंत २० हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून काहींना अटकही झाली आहे. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर NEET UG-2026 ची परीक्षा रद्द करण्यात आली असून, प्रकरणाचे गांभीर्य पाहून केंद्रीय यंत्रणांकडे तपास सोपवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देहराडून पोलिसांनी या कारवाईत राजस्थान पोलिसांना मदत केल्याचे स्पष्ट केले असून, या रॅकेटचा पूर्ण खुलासा करण्यासाठी पुढील तपास वेगाने सुरू आहे.