छ.संभाजीनगर,
No Relief for Kalpana Kharat शहरातील चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात त्यांच्या पत्नी कल्पना खरात यांना तात्काळ दिलासा मिळालेला नाही. अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी दाखल केलेल्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली, मात्र न्यायालयाने सध्या कोणताही अंतरिम दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कल्पना खरात यांनी अटकेची शक्यता लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर विविध कायदेशीर मुद्दे आणि पूर्वीचे काही निकाल सादर करून जामीन मंजूर करण्याची विनंती केली. मात्र न्यायालयाने हे युक्तिवाद तत्काळ स्वीकारले नाहीत.

सुनावणीदरम्यान वकिलांकडून दिलेले संदर्भ आणि पूर्वीचे निर्णय या प्रकरणात लागू होत नाहीत, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पुढील निर्णय राखून ठेवला. त्यामुळे जामीन अर्जावर तातडीचा निर्णय न देता पुढील सुनावणीसाठी तारीख निश्चित करण्यात आली आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजेच २५ ते ३० मे दरम्यान होणार आहे. तोपर्यंत कल्पना खरात यांच्यावर अटकेची शक्यता कायम राहणार आहे. दरम्यान, न्यायालयाने तात्काळ दिलासा नाकारल्यामुळे या प्रकरणात पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडूनही पुढील कायदेशीर कारवाईवर लक्ष ठेवले जात असून, अंतिम निर्णयावरच पुढील दिशा ठरणार आहे.