सिरोंचा नपच्या अध्यक्षपदी पद्मा भोगे यांची अधिकृत घोषणा

    दिनांक :12-May-2026
Total Views |
सिरोंचा, 
Official Announcement by Padma Bhoge सिरोंचा नगरपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या पद्मा भोगे सत्यनारायण यांची नगराध्यक्षपदी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. घोषणा होताच नगरपंचायत परिसरात समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. नगराध्यक्ष निवडीसाठी आयोजित विशेष सभेत पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकृतरीत्या पद्मा भोगे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर समर्थकांनी घोषणाबाजी करत अभिनंदनाचा वर्षाव केला. यामुळे नगरपंचायत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तहसीलदार तथा मुख्याधिकारी अजय सुकंदरवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कामकाज, प्रोसिडिंग आणि कायदेशीर औपचारिकता यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेत संपूर्ण कार्यवाही सुरळीत पार पाडली.
 

Padma Bhoge 
 
 
विशेष म्हणजे, अविश्‍वास ठरावानंतर नगरपंचायतीतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले होते. त्यानंतर सुरू झालेल्या सत्तासंघर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. सुरुवातीला नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार मैदानात होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात दोन उमेदवारी अर्ज मागे घेतले गेल्याने पद्मा भोगे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. पद्मा भोगे या पूर्वी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत स्थानिक राजकारणात स्वतःचा प्रभाव वाढवला. शांत पण प्रभावी राजकीय हालचालींमुळे त्यांनी नगराध्यक्षपदाची शर्यत यशस्वीरीत्या जिंकली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावेळी राकाँ (शरद पवार गट) चे नेते ऋतुराज हलगेकर यांनी संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उपस्थित राहून नवनिर्वाचित नगराध्यक्ष पद्मा भोगे यांचे अभिनंदन केले. दरम्यान, नगराध्यक्षपदाचा फैसला झाल्यानंतर आता संपूर्ण लक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे. कोणत्या गटाला उपाध्यक्षपद मिळणार आणि नवीन सत्तासमीकरण कसे राहणार, याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत उपाध्यक्षपदासाठीही राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच सिरोंचा नगरपंचायतीला नवे नेतृत्व मिळाले असून, आता उत्सुकता उपाध्यक्षपदाच्या निवडीची आहे.