मुंबई,
Ranveer to portray Lord Shiva रणवीर सिंग सध्या आपल्या यशस्वी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’च्या दमदार यशानंतर आता रणवीर एका नव्या आणि भव्य प्रोजेक्टमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंग आता मोठ्या पडद्यावर भगवान शिवाची भूमिका साकारण्याच्या तयारीत आहे. प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांच्या लोकप्रिय कादंबरी 'द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा'वर आधारित चित्रपट मालिकेचे हक्क रणवीरने मिळवल्याची चर्चा सुरू आहे.
माहितीनुसार, हा प्रकल्प रणवीरच्या ‘मा कसम फिल्म्स’ या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार केला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी रणवीरने उद्योगपती कुटुंबातील अनन्या बिर्ला हिच्यासोबत भागीदारी केल्याचे सांगितले जात आहे. सध्या या चित्रपटाचे लेखन सुरू असून संपूर्ण कथा तीन भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सादर करण्याची योजना आखली जात आहे.चित्रपटाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीर सिंगला ‘द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’वर चित्रपट बनवण्याची इच्छा बऱ्याच काळापासून होती. आता या प्रकल्पाचे प्राथमिक काम वेगाने सुरू झाले असून स्क्रिप्टवर विशेष लक्ष दिले जात आहे. निर्माते आधी कथा आणि पटकथा पूर्णपणे मजबूत करण्यावर भर देत आहेत. त्यानंतरच दिग्दर्शक आणि इतर कलाकारांची निवड केली जाणार असल्याचे समजते.
या ट्रिलॉजीच्या पहिल्या भागाचे चित्रीकरण २०२८ पर्यंत सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रणवीर या चित्रपटात भगवान शिवाची मध्यवर्ती भूमिका साकारणार असल्याची चर्चा असली तरी अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही या बातमीमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, रणवीर सिंगकडे आणखी काही मोठे प्रोजेक्ट्सही आहेत. दिग्दर्शक जय मेहता यांच्या ‘प्रलय’ या चित्रपटातही तो दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट २०२६ मध्ये सुरू होण्याची शक्यता असून त्याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.