परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रियेला नवी गती

    दिनांक :12-May-2026
Total Views |
- विद्यापीठाकडून ‘युद्धपातळी’वरील परीक्षा व्यवस्थापन

नागपूर, 
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हिवाळी २०२५ आणि सुरू असलेल्या उन्हाळी २०२६ परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थापन अधिक गतीमान करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. वेळेत आणि दोषरहित निकाल जाहीर करण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Nagpur University 
 
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे हिवाळी २०२५ सत्रात विविध अभ्यासक्रमांच्या एकूण १ हजार २६१ परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यातील ३२३ परीक्षांमध्ये शून्य विद्यार्थी उपस्थिती होती. तर, ९३८ परीक्षांसाठी तब्बल ३ लाख १७ हजार ५४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विद्यापीठाने सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले असून त्यामध्ये ३० दिवसांच्या आत ३५६, ३१ ते ४५ दिवसांत १६१ तर ४५ दिवसांनंतर ७४४ निकाल घोषित करण्यात आले.
उन्हाळी २०२६ परीक्षांसाठी एकूण १०५४ परीक्षा नियोजित असून त्यापैकी ९४४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उर्वरित ११० परीक्षांचे वेळापत्रक १५ मेपूर्वी प्रसिद्ध होणार आहे. आतापर्यंत २६१ परीक्षा पूर्ण झाल्या असून २२ निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
परीक्षा व निकाल प्रक्रियेतील समन्वयासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मूल्यांकन केंद्र, सॉफ्टवेअर यंत्रणा, छाननी पथके आणि महाविद्यालयांमध्ये समन्वय राखून विद्यार्थ्यांना अचूक आणि वेळेत गुणपत्रिका मिळाव्यात यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
दरम्यान, आचार्य पदवी प्रवेशपूर्व परीक्षा ९ व १० मे रोजी यशस्वीपणे पार पडली. या परीक्षेसाठी ३ हजार ३२३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ६८७ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले.
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University  विद्यापीठाने आगामी शैक्षणिक वर्षासाठी रोजगाराभिमुख आणि नाविन्यपूर्ण पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणाही केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर विज्ञान, डाटा विज्ञान, ड्रोन विज्ञान, अर्थशास्त्र तसेच चित्रपट निर्मिती यांसारख्या क्षेत्रांतील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. शिक्षणासोबत रोजगार आणि उद्योगनिर्मितीच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.