अमेरिका-चीन-इराण तणावात नवा भडका!

चीनच्या कंपन्यांवर निर्बंधांचा बडगा

    दिनांक :12-May-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Restrictions on Chinese Companies मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मोठी कारवाई करत चीनमधील काही कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. या कंपन्यांवर इराणला उपग्रह प्रतिमा आणि लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप असून, याचा वापर अमेरिकन आणि मित्र देशांच्या तळांवर हल्ले करण्यासाठी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ८ मे रोजी ही कारवाई जाहीर केली असून, ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात ही पावले उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईचा संबंध “ऑपरेशन एपिक फ्युरी” दरम्यान घडलेल्या घटनांशी जोडला जात आहे.अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, मध्य पूर्वेतील लष्करी तळांची उपग्रह छायाचित्रे इराणकडे पोहोचवणे हे अमेरिकेच्या आणि मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करणारे आहे. अशा कृतींना प्रत्युत्तर देण्याचा इशाराही अमेरिकेने दिला आहे.
 
 
 
china and trump
या निर्बंधांमध्ये हांगझो स्थित मीएन्ट्रॉपी टेक्नॉलॉजी (MizarVision), बीजिंगमधील The Earth Eye आणि चांग ग्वांग सॅटेलाइट टेक्नॉलॉजी या कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या आरोपानुसार, या कंपन्यांनी इराणला लष्करी हालचालींशी संबंधित उपग्रह डेटा उपलब्ध करून दिला किंवा त्यासाठी सहकार्य केले.यापैकी काही कंपन्यांवर यापूर्वीही निर्बंध लादण्यात आले होते. विशेषतः चांग ग्वांग सॅटेलाइट टेक्नॉलॉजीवर इराण समर्थित हुथी बंडखोरांना मदत केल्याचे आरोप यापूर्वीही झाले होते.
 
 
याशिवाय, अमेरिकेने इराणच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंधित संस्थांवरही कारवाई करत त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांसाठी लागणारा कच्चा माल आणि शस्त्र पुरवठा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कवरही लक्ष ठेवले जात असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.ट्रेझरी विभागाने सांगितले की, चीन, इराण, बेलारूस आणि संयुक्त अरब अमिरातीतील काही संस्था आणि व्यक्तींवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. इराणच्या लष्करी क्षमतेला पाठिंबा देणाऱ्या पुरवठा साखळ्या मोडून काढणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच, या कारवाईमुळे अमेरिका-चीन-इराण तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मध्य पूर्वेतील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे चित्र आहे.