खदानीच्या वादातून आरटीआय कार्यकर्त्याची हत्या

    दिनांक :12-May-2026
Total Views |
पालघर,
RTI Activist Murdered in Palghar विरार पूर्वेतील शिरगाव परिसरात भरदिवसा घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. माहितीच्या अधिकार कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात खदान मालकावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम पाटील हे आरटीआय कार्यकर्ते म्हणून विविध प्रकरणांमध्ये माहितीच्या अधिकाराचा वापर करून पाठपुरावा करत होते. मंगळवारी दुपारी ते वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत शिरगाव येथील खदानी परिसरात गेले होते. त्याचवेळी ही धक्कादायक घटना घडली.
 
 
palghar
 
घटनास्थळी अचानक वाद निर्माण झाल्यानंतर खदान मालक महेश भोईर याने त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वाद चिघळून आत्माराम पाटील यांच्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत सोबत असलेले मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू आहे.