नाशिक,
rupali-chakankar : नाशिकमधील बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण आता रूपाली चाकणकर यांच्यासाठी अधिकच अडचणीचे ठरत असून, या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय यंत्रणांच्या हाती गेला आहे. अशोक खरात याने महिलांवरील अत्याचारासोबतच ७० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे मोठे खंडणी रॅकेट चालवल्याचा संशय आहे. याच आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून आता सक्तवसुली संचालनालयाने (ED) रूपाली चाकणकर यांना समन्स बजावले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील गुंतागुंतीमुळे चाकणकर यांना आधीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने चाकणकर यांची साडेपाच तास कसून चौकशी केली होती. या चौकशीत २०१८ ते २०२६ या काळात अशोक खरातच्या विरोधात आलेल्या तक्रारी आणि त्याच्या 'शिवनिका' संस्थानातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्नांचा भडीमार करण्यात आला होता. एसआयटीच्या चौकशीनंतर आता ईडीने या प्रकरणात उडी घेतल्याने यातील मनी लाँड्रिंगचा पैलू अधिक गडद झाला आहे. एसआयटी आपला अहवाल लवकरच ईडीला सादर करणार असून, आर्थिक गैरव्यवहारात सहभाग आढळल्यास चाकणकर यांच्यावर कठोर कारवाईची शक्यता आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.