किडनी विक्री प्रकरणी ‘एसआयटी’ची चौकशी सक्षम

विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची माहिती

    दिनांक :12-May-2026
Total Views |
सीबीआय’ची गरज नाही, तपास शेवटच्या टप्प्यात
चंद्रपूर, 
SIT Inquiry into Kidney Sale Case देशभर पसरलेल्या किडनी विक्री रॅकेटचा तपास आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यातील मुख्य दलाल रामकृष्ण सुंचू पकडल्या गेला असून, दिल्लीचे डॉ. रवींद्रपाल सिंग व त्रिचीच्या स्टार किम्स हॉस्पीटलचा संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. हे दोघेही फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणी सीबीआय चौकशीची गरज नाही. पुढील चौकशीसाठी चंद्रपूर ‘एसआयटी’ सक्षम आहे, असा विश्वास नागपूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी येथे पत्रपरिषदेत व्यक्त केला. नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील अवैध सावकारी प्रकरणाच्या तपासातून किडनी तस्करीचे मोठे रॅकेट उघकीस आले. ते देशव्यापी असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याने त्यास महत्त्व आले असून, तपासासाठी ‘एसआयटी’चे गठण करण्यात आले. मात्र पुढे या तपासात काय झाले, ‘सिबीआय’च्या प्रवेशाची गरज आहे का, अशा प्रश्नांना पाटील उत्तर देत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते.
 
 
adhikshak
 
 
संदीप पाटील आणि आयुष नोपानी यांनी संयुक्तरित्या सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाईल. नशामुक्ती अभियानाबाबत शुन्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले जाणार आहे. चंद्रपूरात विविध मार्गाने ड्रग्स येतात. एक मार्ग बंद केला तर दुसर्‍या मार्गाचा शोध आरोपी करीत असतात. त्यामुळे सारेच मार्ग कसे बंद करता येईल यासाठी येत्या काळात ताकदीने तपास केला जाणार आहे. उद्योगांना त्रास देणार्‍या असामाजिक तत्वांविरुध्दही कडक कारवाई केली जाणार आहे. उद्योजगांना विश्वासात घेतले गेले आहे. त्यांच्या तक्रारीनुसार तपास होईल. रेती तस्करी प्रकरणी ‘ममोका’ लावला जात आहे. चंद्रपूर शहरात खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्यावरच उभे राहणे, अ‍ॅटोचालकांचे मनमानी वागणे आणि रस्ता रोखून धरणे आदी प्रश्नांवर येत्या तीन ते चार महिन्यात ठोस उपाय शोधला जाणार आहे. मोठी वाहने रस्त्यावर उभी राहणार नाही यासाठी काही जागा शोधणे सुरू आहे. पुढे त्यांना पार्किंग तेथेच करावी लागेल. या सार्‍या समस्यांबाबत आम्ही गंभीर आहोत, असेही ते म्हणाले.