खैबर पख्तुनख्वामध्ये आत्मघाती स्फोट; ९ ठार

    दिनांक :12-May-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Suicide blasts in Khyber Pakhtunkhwa पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात मोठा स्फोट होऊन भीषण दहशत पसरली आहे. लक्की मारवत जिल्ह्यातील नौरंग बाजारात झालेल्या या आत्मघाती हल्ल्यात किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून ३५ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गर्दीच्या बाजारात अचानक एक स्फोटकांनी भरलेली ऑटो-रिक्षा आली आणि काही क्षणांतच मोठा स्फोट घडवण्यात आला. हा आत्मघाती हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. स्फोटाच्या वेळी बाजारात मोठी गर्दी असल्याने जीवितहानी अधिक झाली.
 
 
ckasrter
 
या घटनेत दोन वाहतूक पोलीस कर्मचारी आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना बन्नू आणि पेशावर येथील मोठ्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. स्थानिक रुग्णालयांमध्ये तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली असून आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.स्फोटाची माहिती मिळताच रेस्क्यू पथके आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बाजारातील अनेक दुकाने उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, खैबर पख्तुनख्वा प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारकडून पीडित कुटुंबांना मदत आणि दिलासा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या भीषण हल्ल्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात पुन्हा एकदा सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे.