मुंबई,
sunetra-pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून पक्षात मोठे वादळ निर्माण झाले असून, अखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हातात आली, मात्र नुकत्याच समोर आलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारख्या मातब्बर नेत्यांची नावे गायब असल्याने पक्षात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. २५ वर्षांहून अधिक काळ पक्षाचा कणा राहिलेल्या या दिग्गजांना डच्चू देऊन सत्तेची सर्व पदे पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे सोपवल्याचे चित्र निर्माण झाल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम होता.

या वादावर स्पष्टीकरण देताना सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री ट्वीट करून आपली भूमिका मांडली. माध्यमांमध्ये फिरत असलेल्या यादीमध्ये काही तांत्रिक त्रुटी असून, त्यात लवकरच बदल केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, लक्षणीय बाब म्हणजे निवडणूक आयोगाला हे पत्र २९ एप्रिल रोजीच देण्यात आले होते. यापूर्वीही प्रफुल्ल पटेल यांचे नाव कार्याध्यक्ष पदावरून वगळले गेले होते आणि त्यावेळी देखील ती 'नजरचूक' असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिग्गज नेत्यांची नावे वगळली जाणे हा केवळ योगायोग आहे की जाणीवपूर्वक केलेली रणनीती, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. या स्पष्टीकरणानंतरही पक्षांतर्गत गटबाजी आणि बदलांचे वारे शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत.