VIDEO: टीम डेव्हिडच्या 'मिडल फिंगर' वादावर बीसीसीआय ॲक्शन मोडमध्ये

    दिनांक :12-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
team-david-middle-finger-controversy : आयपीएल २०२६ मधील १० मे रोजी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्यात आरसीबीने विजय मिळवला असला तरी, त्यांचा आक्रमक फलंदाज टीम डेव्हिड एका मोठ्या वादात सापडला आहे. सामना जिंकल्यानंतर डगआऊटमधून मुंबईच्या खेळाडूंना अश्लील हातवारे केल्याप्रकरणी बीसीसीआयने टीम डेव्हिडवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या वर्तणुकीसाठी त्याच्या मॅच फीमधील ३० टक्के कपात करण्यात आली असून त्याच्या खात्यात दोन 'डिमेरिट पॉइंट्स' जोडले गेले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आयपीएल प्रशासनाने ही गंभीर दखल घेतली आहे.
 
 

team-david-middle-finger-controversy
 
 
टीम डेव्हिडसाठी ही चिंतेची बाब आहे कारण या हंगामातील त्याची ही दुसरी चूक ठरली आहे. यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंचांच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे त्याच्यावर आधीच एक डिमेरिट पॉइंटची कारवाई झाली होती. आता त्याच्या नावावर एकूण तीन डिमेरिट पॉइंट्स जमा झाले आहेत. बीसीसीआयच्या कडक नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूचे चार डिमेरिट पॉइंट्स पूर्ण झाले, तर त्याच्यावर थेट सामन्यांची बंदी (बॅन) घातली जाऊ शकते. हे पॉइंट्स ३६ महिन्यांपर्यंत कायम राहत असल्याने, टीम डेव्हिडला पुढील काही हंगाम अत्यंत सावधगिरीने खेळावे लागणार आहे, अन्यथा त्याला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
 
 


सौजन्य: सोशल मीडिया