चेन्नई,
Udhayanidhi Stalin's Statement उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा सनातन धर्मावर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे. तामिळनाडू विधानसभेत बोलताना त्यांनी सनातन धर्म लोकांमध्ये भेद निर्माण करतो आणि तो संपवला गेला पाहिजे, असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फुटले आहे. विधानसभेतील चर्चेदरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘वंदे मातरम’ या गीतावरही आक्षेप घेतला. तामिळनाडूच्या राज्यगीताला दुय्यम स्थान दिले जाऊ नये, असे सांगताना त्यांनी इतर राज्यांतील शपथविधी कार्यक्रमांचा उल्लेख केला. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या एका शपथविधी सोहळ्यात ‘वंदे मातरम’ वाजवण्यात आले नव्हते, मात्र तामिळनाडूत ते वाजवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. राज्याच्या परंपरा आणि ओळख यांना प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात नव्या सरकारचा शपथविधी झाला असून त्यानंतरचे पहिले अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात बोलताना उदयनिधी यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन राज्याच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले. राजकीय मतभेद असले तरी तामिळनाडूच्या हितासाठी सर्वांनी सहकार्याने पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि स्वतः एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतल्याचा उल्लेख करत, अनुभव आणि कल्पनांची देवाणघेवाण व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली. विरोधी पक्षाच्या सूचनांनाही सरकारने गांभीर्याने घ्यावे, असेही उदयनिधी स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.