शाळा-मंदिरांजवळ दारू विक्री बंद!

विजय सरकारचा मोठा निर्णय

    दिनांक :12-May-2026
Total Views |
चेन्नई,
Vijay Government's Major Decision विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोठे आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था आणि बसस्थानकांच्या ५०० मीटर परिसरात असलेली दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या निर्णयानुसार पुढील दोन आठवड्यांत एकूण ७१७ दारू दुकाने बंद करण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या आदेशानंतर संबंधित विभागांनी विविध भागांतील दुकानांची तपासणी केली. तपासात अनेक दुकाने नियमांचे उल्लंघन करत संवेदनशील भागांच्या जवळ सुरू असल्याचे समोर आले. यामध्ये प्रार्थनास्थळांच्या परिसरातील २७६ दुकाने, शैक्षणिक संस्थांच्या जवळील १८६ दुकाने आणि बसस्थानकांच्या आसपासची २५५ दुकाने असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 

Vijay Government 
 
सरकारने स्पष्ट केले की, नागरिकांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः विद्यार्थ्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणांवरील वातावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड सध्या राज्यभरात ४,७६५ दारू विक्री दुकाने चालवत आहे. त्यापैकी नियमांच्या कक्षेत येणारी ७१७ दुकाने बंद करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील मद्यविक्री व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये विजय यांच्या टीव्हीके पक्षाने मोठी कामगिरी करत १०८ जागांवर विजय मिळवला होता. बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठता न आल्याने काँग्रेससह काही सहयोगी पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या कारभाराची धुरा स्वीकारली.