वडनेर,
wadner-girl-assault-case : वर्धा जिल्ह्यातील वडनेर येथील गाजलेल्या बालिका अत्याचार प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी तिघांना अटक केलेली आहे. येथील अमित झाडे (40), मारुती दिवे (52), सुधीर दिवे (54) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपीला मदत करणे तसेच पीडित कुटुंबाला धमकी दिल्याचा आरोप या आरोपींवर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील पाचव्या वर्गात शिकणाऱ्या अकरा वर्षीय बालिकेवर दुष्कर्म केल्याची घटना २ मे रोजी उघडकीस आली होती. या अत्याचार प्रकरणात आधीच मुख्य आरोपी नरेश दिवे याचेवर पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपासादरम्यान काही आरोपींनी मुख्य आरोपीसोबत संगनमत करून पीडितेला धमकावल्याचे निष्पन्न झाल्याने भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(3) व 3(5) अंतर्गत अतिरिक्त कलमे वाढविण्यात आली आहेत. या प्रकरणात अमित झाडे, मारुती दिवे आणि सुधीर दिवे राहणार वडनेर या तिघांना पोलिसांनी अटक केली असून सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी आरोपींची न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे. सदर कारवाई पोक्सो सेल उपविभाग हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणात यापूर्वी मुख्य आरोपी नरेश दिवे व एका खाजगी वैद्यकीय व्यवसायिईकाला अटक करण्यात आली होती. अत्याचार ग्रस्त बालिकेला न्याय मिळावा तसेच प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पीडितेवरील अत्याचार प्रकरणात आधीच मुख्य आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान काही आरोपींनी मुख्य आरोपीसोबत संगनमत करून पीडितेला धमकावल्याचे निष्पन्न झाल्याने भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(3) व 3(5) अंतर्गत अतिरिक्त कलमे वाढविण्यात आली आहेत.