नवी दिल्ली,
weather forecast भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी देशातील अनेक राज्यांसाठी पावसाचा आणि मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरियाणासह अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल आणि ओडिशा परिसरात ट्रोपोस्फिअर स्तरावर निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या प्रभावामुळे हवामानात बदल होत असून त्याचा परिणाम अनेक राज्यांवर दिसून येत आहे. यामुळे पुढील काही दिवस वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
राजधानी दिल्लीसाठीही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येथे कमाल तापमान सुमारे ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. उत्तर प्रदेशात एकूण ३८ जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये ४० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील बिजनौर, मुरादाबाद, मेरठ, गाझियाबाद, अलीगढ यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी, बहराइच, सीतापूर, हरदोई आणि इतर जिल्ह्यांमध्येही पाऊस होऊ शकतो.
बिहारमध्येही हवामान विभागाने गंभीर इशारा दिला आहे. पूर्व आणि पश्चिम चंपारण, गोपालगंज, मधुबनी, दरभंगा, समस्तीपूर, वैशाली आणि सुपौल या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ७० किलोमीटर प्रतितासापर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज आहे.weather forecast पंजाबमध्ये अमृतसर, लुधियाना, पठाणकोट, बठिंडा आणि होशियारपूरसह अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राजस्थानमधील अलवर, सीकर, चुरू, बारमेर, जोधपूर आणि झुंझुनू या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने नागरिकांना वीज पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे पुढील काही दिवस राज्यांमध्ये वातावरण अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.