मुंबई,
Yellow Alert for Akola, Amravati महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा उष्णतेची लाट परतण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार विदर्भात पुढील काही दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होऊ शकते. या पार्श्वभूमीवर अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला येथे तब्बल 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे.

राजस्थान आणि गुजरात परिसरातील हवामान प्रणालीमुळे विदर्भात कोरडी आणि गरम हवा वाहत असल्याने तापमानात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मे महिन्यात 44 ते 46 अंशांपर्यंत तापमान नोंदवणे या भागात सामान्य असले तरी यंदा उष्णतेची तीव्रता अधिक असल्याचे चित्र आहे.जळगाव जिल्ह्यातही उष्णतेचा कहर सुरू असून पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव परिसरात तापमान 44 अंशांच्या पुढे गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला असून बाजारपेठांमध्येही हालचाली कमी झाल्याचे दिसत आहे. पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
धुळे जिल्ह्यातही तापमान 44 अंशांपेक्षा अधिक नोंदवले गेले असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम शेती आणि बाजारपेठांवर होत असून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहार कमी झाले आहेत.नाशिक शहरातही तापमानाने यंदाच्या हंगामातील उच्चांक गाठला असून 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचला आहे. हवामान विभागाने नाशिकसाठीही यलो अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात तापमान जवळपास 45 अंशांच्या आसपास पोहोचले असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. उष्माघात आणि डिहायड्रेशनचा धोका लक्षात घेता पाणी, ओआरएस आणि लिंबूपाण्याचे सेवन वाढवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच उष्माघातासाठी विशेष कक्षांची स्थापना करण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली आहे. एकूणच राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट परतत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.