विमान अपघाताने पुन्हा हादरली बारामती!

रेडबर्ड प्रशिक्षणार्थी विमान कोसळले

    दिनांक :13-May-2026
Total Views |
बारामती,
Aircraft crashes in Baramati पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात पुन्हा एकदा विमान अपघाताची घटना घडली असून, रेडबर्ड अकॅडमीचे एक प्रशिक्षणार्थी विमान आज सकाळी अपघातग्रस्त झाले. बारामती विमानतळाजवळील गोजुबावी गावाच्या हद्दीत हे विमान कोसळले. सुदैवाने, या मोठ्या अपघातात विमानात असलेला प्रशिक्षणार्थी पायलट सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 
 
Aircraft crashes in Baramati
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ८:५० च्या सुमारास या विमानाने उड्डाण केले होते. मात्र, काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. विमान जमिनीच्या दिशेने वेगाने खाली येत असताना त्याचा एक भाग विजेच्या खांबाला धडकला आणि त्यानंतर विमानाचे क्रॅश लँडिंग झाले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमान खूपच कमी उंचीवर उडत होते आणि अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने जमिनीवर आदळले.
 
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. विमानात केवळ एकच प्रशिक्षणार्थी वैमानिक होता, ज्याने प्रसंगावधान राखल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. सध्या पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून अपघातस्थळाची पाहणी केली जात आहे. बारामती परिसरात वारंवार होणाऱ्या या विमान अपघातांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.