आनंदवन एक राष्ट्रीय मेळावा : डॉ. विकास आमटे

आनंदवनात सेवा साधना कृतज्ञता सोहळा

    दिनांक :13-May-2026
Total Views |
वरोडा,
Anandvan a national fair कुष्ठरोगावरील सामाजिक कलंक दूर करण्यासाठी स्व. बाबा आमटे यांनी उभे केलेले आनंदवन हे केवळ पुनर्वसन केंद्र नाही, तर समाजातील सर्व विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते यांना जोडणारा राष्ट्रीय मेळावा आहे, असे उद्गार महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी काढले. आनंदवनातील सेवेच्या 76 वर्षांच्या मानवतावादी प्रवासाची ओळख करून देण्यासाठी पुणे येथील आनंदवन मित्र मंडळातर्फे सेवा साधना कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात रविवार, 10 मे रोजी झालेल्या या कार्यक्रमाला जलसंपदा प्रकल्प विकासचे प्रधान सचिव एकनाथ डवले, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले, पल्लवी आमटे, बाबासाहेब कावटी, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू व डॉ. विजय पोळ उपस्थित होते.
 
 

amte 
 
या कार्यक्रमात आनंदवनसोबत जोडलेल्या सुधाकर कडू, डॉ. विजय पोळ, पल्लवी आमटे यासारख्या व्यक्तींचा निष्काम सेवावर्ती या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू व पल्लवी आमटे यांची प्रा. विजयेता विटणकर यांनी प्रकट मुलाखत घेत आनंदवनचे अंतरंग सर्वांसमोर उलघडले. अवघ्या 14 रुपयापासून सुरू झालेल्या आनंदवनाने आज सामाजिक कार्याचा मोठा टप्पा गाठला असला तरी, या प्रवासामागे पैसा नव्हे, तर संवेदनशील माणसांची उभी केलेली साखळी महत्त्वाची आहे, अश्या शब्दात डॉ. विकास आमटे यांनी आनंदवनच्या प्रवासातील अनेक भावनिक आणि प्रेरणादायी आठवणी उलगडल्या.
 
 
दिव्यांग शाळांचे समायोजन होणार : सचिंद्रप्रताप सिंह
नवीन शैक्षणिक धोरणानुसार विविध कलागुणांना अतिरिक्त कलागुण न मानता मुख्य शिक्षणाचा भाग बनवला गेला आहे. तसेच आगामी काळात दिव्यांग शाळा स्वतंत्र न ठेवता समायोजन करून एकत्र शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मत यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी व्यक्त केले.