वर्धा,
Angwar Otale Petrol उसनवारीच्या पैशाच्या वादातून आकाश चिडे रा. चंद्रपूर याने खानावळ समोर धिंगाणा घालत अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खानावळमध्ये असलेल्या महिलेला माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणाला. मात्र, लग्नास नकार दिल्याने स्वत:ला पेटवून दिले. मात्र, तुच मला पेटविले असे पोलिसांना सांगून तुला फसवितो, असे म्हणत आकाश चिडे पळून गेला. ही घटना जय माँ शारदा मेस समोरील सार्वजनिक रस्त्यावरील एस्टेन्शन कॉलनी भुगाव येथे १० रोजी घडली. याप्रकरणी १२ रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, सरोज कल्लू सिंग (४०) यांचा भुगाव रस्त्यावर मेसचा व्यवसाय आहे. चंद्रपूर येथील आकाश चिडे हा चालक असून काही महिन्यांपूर्वी यांच्यात ओळख झाली. सरोज सिंग यांनी आकाश चिडे याच्याकडून ४५ हजार रुपये उसने घेतले होते.
त्यापैकी काही रकम तिने त्याला परतही केली. मात्र, उर्वरित रकमेसाठी तो सरोजला फोन करून नेहमी शिवीगाळ करायचा. दरम्यान, १० रोजी आकाश चिडे हा सरोजच्या मेसजवळ आला. स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आरडाओरड करू लागला. त्यावर सरोजने त्याला हटकले आणि तुझे पैसे परत करते, असे म्हटले. मात्र, आकाशने तिला शिवीगाळ करीत माझ्यासोबत लग्न कर, अशी अट घातली. सरोजने लग्नास नकार दिल्याने आकाशने स्वत:ला पेटविले. सरोजने त्याला विझवत पोलिसांना माहिती दिली. पोलिस येत असल्याचे तिने त्याला सांगितले. मात्र, आकाशने तू मला पेटविले असे मी पोलिसांना सांगून तुला फसवितो अशी धमकी देऊन तो पळून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, सावंगी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंद करीत प्रकरण तपासावर घेतले आहे.