नायजेरियातील तुम्फा बाजार रक्ताळला!

लष्करी हल्ल्यात १०० नागरिकांचा मृत्यू

    दिनांक :13-May-2026
Total Views |
अबुजा,
Attacks at Tumfa Market in Nigeria नायजेरियाच्या उत्तर भागात लष्कराने केलेल्या एका हवाई हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. एका गजबजलेल्या बाजारावर झालेल्या या हल्ल्यात अंदाजे १०० निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचा खळबळजनक दावा 'ॲम्नेस्टी इंटरनॅशनल' या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने केला आहे. विशेष म्हणजे, मृतांमध्ये मोठ्या संख्येने लहान मुले आणि तरुण मुलींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत असल्याने नायजेरियन सैन्याच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 
 
Tumfa Market in Nigeria
 
मिळालेल्या माहितीनुसार, तुम्फा येथील स्थानिक बाजारात लोकांची मोठी गर्दी असताना अचानक लष्कराकडून हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्याबाबत माहिती देताना ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचे संचालक इसा सानुसी यांनी सांगितले की, केवळ एकाच गावात ८० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मारले गेलेले लोक हे कोणत्याही सशस्त्र टोळीचे सदस्य नसून ते सर्वसामान्य नागरिक होते, असे पुरावे समोर येत आहेत. रेड क्रॉसच्या अधिकाऱ्यांनीही या घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
दुसरीकडे, नायजेरियन लष्कराने हवाई हल्ला केल्याची कबुली दिली असली, तरी नागरिकांच्या मृत्यूचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. लष्कराचे प्रवक्ते मायकल ओनोजा यांनी स्पष्ट केले की, सैन्य केवळ सशस्त्र दहशतवादी गटांना लक्ष्य करत असून नागरिकांना कोणतीही इजा होऊ नये याची काळजी घेतली जाते. मात्र, गेल्या महिन्यातही अशाच प्रकारच्या एका चुकीच्या हवाई हल्ल्यात १०० हून अधिक लोक मारले गेले होते, ज्यामुळे लष्करी कारवाईतील अचूकतेवर संशय व्यक्त केला जात आहे.