बळीराजाच्या कष्टाला 'एमएसपी'चे कवच!

केंद्र सरकारचा धडाकेबाज निर्णय

    दिनांक :13-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Balirajachaya Kashtala MSPache Kavach खरीप पिकांच्या पेरणीचा हंगाम सुरू होत असतानाच केंद्र सरकारने देशातील बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीच्या (CCEA) बैठकीत २०२६-२७ हंगामासाठी धानासह १४ प्रमुख खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार असून शेती व्यवसायाला अधिक उभारी मिळण्याची शक्यता आहे.
 
 
shetkari pik
 
 
सरकारने यावर्षी सामान्य धानाच्या आधारभूत किमतीत ७२ रुपयांची वाढ केली असून, आता हा दर २,४४१ रुपये प्रति क्विंटल झाला आहे. तसेच 'अ' दर्जाच्या धानासाठी २,४६१ रुपये प्रति क्विंटल किंमत निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यावेळी तेलबिया आणि कडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यफूल बियाण्यांच्या दरात सर्वाधिक ६२२ रुपयांची वाढ करून तो ८,३४३ रुपये प्रति क्विंटलवर नेला आहे. कापसाच्या किमतीतही ५५७ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली असून तूर, उडीद, सोयाबीन आणि भरड धान्यांच्या दरातही सुधारणा करण्यात आली आहे.
 
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, सर्व १४ पिकांचा किमान आधारभूत भाव हा त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा किमान ५० टक्के जास्त ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हाती सुमारे २.६० लाख कोटी रुपये पडतील, असा सरकारचा अंदाज आहे. देशाचे इतर देशांवरील आयातीचे अवलंबित्व कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भात आणि गव्हाव्यतिरिक्त कडधान्ये व तेलबियांकडे वळावे, हा या दरवाढीमागचा मुख्य उद्देश आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, या वाढीव किमतीमुळे शेतकरी लागवडीसाठी प्रोत्साहित होतील, ज्याचा फायदा देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेला आणि अन्नसुरक्षेला होईल.