अनिल कांबळे,
नागपूर,
boyfriend-commits-suicide : घरासमाेर राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीशी सूत जुळल्यानंतर दाेघांनीही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दाेघांमध्ये काेणत्यातरी कारणावरुन वाद झाल्यामुळे प्रियकराने घरात गळास घेऊन आत्महत्या केली. प्रियकराच्या मृत्यूची वार्ता कळताच प्रेयसीनेही हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबियांनी तरुणीला वेळीच रुग्णालयात दाखल करीत तिचा जीव वाचवला. ही घटना आज मंगळवारी लकडगंज पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आयुष असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

आयुष हा दाणागंज परीसरात राहत हाेता. आयुषचे आईवडिल शासकीय सेवेत आहेत. एकुलता असलेला आयुष रेल्वेस्थानकावर हाऊसकिपींगचे काम करताे. त्याचे घराशेजारी राहणाऱ्या संजना (काल्पनिक नाव) हिच्याशी सूत जुळले. दाेघांची मैत्री आणि नंतर प्रेमप्रकरण सुरु झाले. दाेघांचे प्रेमप्रकरण वस्तीत गाजले. त्यामुळे संजनाच्या आईने तिला विचारणा केली. तिने प्रेमसंबंधाची कबुली दिली. तिच्या आईने आयुषला घरी बाेलावले आणि त्याची समजूत घातली. मात्र, त्याने प्रेमाची कबुली देऊन तिच्याशीच लग्न करणार असल्याचे ठणकावून सांगितले. दाेन्ही कुटुंबियांनी चर्चा केली.अनुचित घटना हाेण्याची शक्यता लक्षात घेता कुटुंबियांनी विराेध केला नाही. येत्या काही दिवसांत दाेघांचा प्रेमविवाह नियाेजित हाेता.
वादाची ठिणगी आणि आत्महत्या
आयुष आणि संजनाचे काेणत्यातरी कारणावरुन वाद झाला. त्या वादातून आयुषने रागाच्या भरात गळास घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. संजनाला व्हिडिओ काॅल केला आणि त्याने ‘ मला शेवटचे बघून घे’ असे म्हणून गळास घेऊन आत्महत्या केली. तिने लगेच कुटुबियांना माहिती दिली. आयुषच्या घरी पाेहचेपर्यंत ताे मृतावस्थेत आढळून आला. या प्रकरणी लकडगंज पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. आत्महत्येअगाेदर त्याने माेबाईलमधून चॅट्स डिलीट केले हाेते. पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करत त्याचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविला आहे. त्याने कुठलीही सुसाईड नाेट न साेडल्याने आत्महत्येचे नेमके कारण समाेर येऊ शकलेले नाही. पाेलीस त्याच्या निकटवर्तीयांशी बाेलून कारण शाेधण्याचा प्रयत्न करत आहेत
प्रेयसीने कापली हाताची नस
आयुषचा मृतदेह बघताच संजनाचा संयम ढळला. तिने लगेच घर गाठले. चाकूने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार तिच्या आईच्या लक्षात आला. तिने लगेच संजनाला रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्यामुळे संजनाचा जीव वाचला.