तामिळनाडूत 'विजय' उत्सव!

मुख्यमंत्री विजय यांनी बहुमत केले सिद्ध

    दिनांक :13-May-2026
Total Views |
चेन्नई,
Chief Minister Vijay Proves His Majority तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर आज अखेर पडदा पडला आहे. विधानसभेत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण विश्वासदर्शक ठरावात मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आपले बहुमत यशस्वीपणे सिद्ध केले. या ऐतिहासिक चाचणीत मुख्यमंत्री विजय यांच्या बाजूने १४४ आमदारांनी मतदान केले, तर त्यांच्या विरोधात केवळ २२ मते पडली. पाच आमदारांनी यावेळी तटस्थ राहणे पसंत केले. या विजयामुळे विजय सरकारवरील टांगती तलवार आता दूर झाली असून राज्याच्या सत्तेवर त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे.
 
 

Chief Minister Vijay Proves His Majority 
 
विधानसभेतील या प्रक्रियेदरम्यान प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार हल्ला चढवला. टीव्हीके सरकारला मिळणारा पाठिंबा हा लोकशाही मूल्यांना धरून नसल्याचा आरोप करत त्यांनी डीएमके सदस्यांसह सभागृहातून सभात्याग केला. उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका करताना बंडखोर आमदारांच्या भेटीचा उल्लेख केला आणि राज्यात 'परिवर्तन' सुरू आहे की 'व्यवहार', असा खोचक सवाल उपस्थित केला. "हेच का तुमचे स्वच्छ शासन?" असे विचारत त्यांनी घोडेबाजाराच्या आरोपांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
 
 
विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सभागृहात अतिशय ठामपणे प्रत्युत्तर दिले. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचे सरकार पूर्णपणे 'धर्मनिरपेक्ष' तत्त्वावर चालेल. विरोधकांनी केलेले घोडेबाजाराचे आरोप फेटाळून लावताना विजय म्हणाले की, त्यांचे सरकार कामाच्या बाबतीत प्रचंड वेगवान असेल, मात्र सत्तेसाठी कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करणार नाही. तसेच, मागील सरकारांनी सुरू केलेल्या सर्व जनकल्याणकारी योजना त्यांचे सरकार अधिक प्रभावीपणे पुढे नेईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी तामिळनाडूच्या जनतेला दिले.