प्रसिद्ध अभिनेते दिलीप राज यांचे निधन

    दिनांक :13-May-2026
Total Views |
बंगळुरू,
Dilip Raj Passes Away कन्नड चित्रपट आणि दूरदर्शन सृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा, प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते दिलीप राज यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला असून कलाकार आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप राज यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
 
 
Dilip Raj Passes Away
 
दिलीप राज यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाने केवळ चित्रपटच नव्हे, तर दूरदर्शन, रंगभूमी आणि डबिंग क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. 'मिलन' या चित्रपटात दिवंगत सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्यासोबत त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका प्रचंड गाजली होती. याशिवाय 'यू-टर्न', 'ऑर्केस्ट्रा म्हैसूर', 'बॉयफ्रेंड' आणि 'लव्ह मॉकटेइल ३' यांसारख्या अनेक उल्लेखनीय चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
चित्रपटांइतकेच त्यांचे दूरदर्शन क्षेत्रातील योगदानही मोठे होते. 'हिटलर कल्याणा' या मालिकेतील त्यांच्या मुख्य भूमिकेने त्यांना घराघरांत लोकप्रियता मिळवून दिली. यासोबतच 'रंगोली', 'कुमकुम भाग्य', 'मंगल्या' आणि 'रथसप्तमी' यांसारख्या अनेक मालिकांमधील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. अभिनयापलीकडे जात त्यांनी 'डीआर क्रिएशन्स' या स्वतःच्या बॅनरखाली 'पारू' आणि 'कृष्णा रुक्कू' सारख्या यशस्वी मालिकांची निर्मिती करून निर्माता म्हणूनही आपली मोहोर उमटवली होती. दिलीप राज यांच्या आकस्मिक जाण्याने कन्नड कलाविश्वातील एका प्रतिभावान कलाकाराचा अंत झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे चाहते आणि सहकलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असून, त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.