वरूड,
female-student-dies : नजीकच्या सुरळी येथील १६ वर्षीय विद्यार्थिनी घरी काम सुरू असताना मोबाईल चार्जिंगवर लावायला गेली. तेव्हाच तिला विजेचा जोरदार धक्का बसल्याने तिला तिच्या आई वडिलांनी तत्काळ वरूडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर घटना बुधवार १२ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताचे दरम्यान घडली. मृत्यूची बातमी गावात पोहचताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार, जान्हवी किशोर सोनारे (१६) रा. सुरळी ता.वरूड जि.अमरावती असे मृतक युवतीचे नावं आहे. मृतक जान्हवी हीने नुकतीच प्रथम श्रेणीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. अकरावी प्रवेशाकरिता तिची धावपळ सुरू होती. बुधवारी घरी काम सुरू होते. ती सायंकाळी साडेसहा वाजता मोबाईल चार्जिंगवर लावण्यासाठी प्लगजवळ गेली. तेव्हा तिला विजेचा जोरदार धक्का बसला. प्रकृती गंभीर असताना आई वडिलांसह शेजाऱ्यांनी वरूड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आई वडिलांना दोन मुली असून मृतक ही लहान मुलगी आहे. सोनारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुरळी गावात मृत्यूची बातमी पसरताच सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.