गुंजखेड उपकेंद्राला 'दांडीबहाद्दर' अधिकाऱ्याचे ग्रहण!

    दिनांक :13-May-2026
Total Views |
लोणार,
Gunjkhed Health Sub-centre News तालुक्यातील गुंजखेड येथील आरोग्य उपकेंद्रात नियुक्त असलेले समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) सातत्याने कामावर गैरहजर राहत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. शासनाच्या 'आयुष्मान भारत' सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेलाच हरताळ फासणाऱ्या या बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे संतप्त झालेल्या गुंजखेडच्या गावकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, संबंधित अधिकाऱ्याची तात्काळ बदली न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा लोणार तालुका आरोग्य अधिकारी (T.H.O.) कार्यालयाला दिला आहे.
 
 

Health Sub-centre 
 
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काची आणि तात्काळ आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने गावोगावी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, गुंजखेड येथे नियुक्त असलेले अधिकारी आपल्या कर्तव्याप्रती कमालीचे उदासीन असून, त्यांच्या वारंवार होणाऱ्या अनुपस्थितीमुळे या योजनेचा मूळ हेतूच धोक्यात आला आहे. या मनमानी कारभारामुळे गावातील गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्ध रुग्णांना साध्या उपचारासाठीही इतरत्र भटकंती करावी लागत असून, त्यांना नाहक आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
 
 
या गंभीर समस्येची दखल घेत गुंजखेड येथील नागरिकांनी लोणार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात अधिकृत तक्रार अर्ज सादर केला आहे. जर या 'दांडीबहाद्दर' अधिकाऱ्याची तात्काळ हकालपट्टी करून त्या जागी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा कर्तव्यदक्ष अधिकारी नियुक्त केला नाही, तर लोकशाही मार्गाने मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर नागवंशी संघपाल पन्हाड, विजय उत्तम पाईक, रवींद्र पाईक, अनिल बबन वाठोरे, समाधान नामदेव सुलताने, गौतम जावळे यांच्यासह गुंजखेडमधील अनेक जागरूक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाच्या या बेफिकीर वृत्तीमुळे आता ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.