बॉम्बच्या धमकीने पंजाबमध्ये 'हाय अलर्ट

    दिनांक :13-May-2026
Total Views |
चंदीगड,
High Alert in Punjab Following Bomb Threat पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या स्फोटांच्या सत्रांनंतर आता थेट मुख्यमंत्री आणि बड्या नेत्यांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दहशतवादी हल्ल्यांच्या शक्यतेमुळे पंजाब पोलीस आधीच सतर्क असतानाच, बुधवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी बॉम्बची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. यासोबतच पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखर आणि भाजपच्या पंजाब व दिल्लीतील मुख्यालयांनाही ईमेलद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास यंत्रणांना सतर्क केले असून राज्याच्या सीमांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
 
Following Bomb Threat
 
राज्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या २४ तासांत झालेले दोन मोठे स्फोट. मंगळवारी रात्री जालंधरमधील बीएसएफच्या पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर आणि त्यानंतर काही तासांनी अमृतसरमधील खासा आर्मी कँटोन्मेंट परिसरात स्फोट झाले होते. सुदैवाने, या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, लष्करी तळांच्या जवळ अशा प्रकारे स्फोट झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी २७ एप्रिल रोजी पतियाळामध्ये एका मालगाडीचा स्फोट घडवण्यात आला होता, ज्या प्रकरणी पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'आयएसआय' समर्थित खलिस्तानवादी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.