नवी दिल्ली,
use public transport पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत आणि संसाधनांच्या संतुलित वापराच्या आवाहनाचा परिणाम आता राजकीय वर्तुळात दिसू लागला आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री कपिल मिश्रा आणि आशिष सूद यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत मेट्रोने प्रवास केला असून, या निर्णयाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी बुधवारी कार्यालयात जाण्यासाठी दिल्ली मेट्रोचा वापर केला. त्यांनी सोशल मीडियावर आपला मेट्रो प्रवास शेअर करत सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याचे आवाहनही केले. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी शक्य तितका सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची शपथ घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मंत्री आशिष सूद यांनीही मंगळवारी मेट्रो आणि ई-रिक्षाचा वापर करत विविध सरकारी कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. त्यांच्या या कृतीमुळेही सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. या घडामोडींमुळे जनतेतही इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनी स्वतः उदाहरण घालून दिल्यामुळे सकारात्मक संदेश जात असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.
तथापि, दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह हे मोठ्या वाहन ताफ्यासह दिसल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका देखील करण्यात येत आहे.use public transport त्यामुळे एकीकडे इंधन बचतीचा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवला जात असताना, दुसरीकडे राजकीय वर्तुळात या विषयावर चर्चा सुरूच आहे.