वर्धा,
Open sale of liquor in Hotel Kashish वर्धा ते वायगाव निपाणी रस्त्यावर असलेल्या हॉटेल कशिश रेस्टॉरंटमध्ये खुलेआम अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी धाड टाकून ७१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. इंझापूर येथील हॉटेल कशिश रेस्टॉरंटमध्ये बारसारखी व्यवस्था करून टेबल-खुर्चीवर बसवून दारू पिण्याची व्यवस्था केली जाते. माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांची चाहुल लागताच शंकर दानानी पळून गेला. हॉटेलची पाहणी केली असता तीन जण बसून होते. टेबलवर दारूची बॉटल आणि ग्लासही आढळून आले. पोलिसांनी झडती घेतली असता देशी-विदेशी दारूचा साठाही आढळून आला. पोलिसांनी दारूसह टेबल-खुर्च्या, फ्रीज असा ७१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी शंकर दानानी, राहुल बोरले, सुनील बहल आणि प्रवीण कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई ठाणेदार पंकज वाघोडे, अभय खोब्रागडे, शाम सलामे, गौरव नरताम, अंजली गाडेकर यांनी केली.