फिटनेसची आवड, कोट्यवधींचा व्यवसाय आणि संशयास्पद मृत्यू!

    दिनांक :13-May-2026
Total Views |
लखनऊ,
Pratik Yadav's Suspicious Death उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव प्रतीक यादव यांच्या आकस्मिक आणि संशयास्पद निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास प्रतीक यांना लखनऊच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. प्रतीक यादव हे भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ होते.
 
 
pratik
 
प्रतीक यादव यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र त्यांच्या मृत्यूभोवती संशयाचे जाळे निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ते घराच्या स्वयंपाकघरात बेशुद्ध अवस्थेत सापडले होते आणि त्यांच्या शरीरावर काही जखमांच्या खुणा असल्याचेही समोर आले आहे. मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवाल आल्यानंतरच सत्य समोर येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ७ जुलै १९८७ रोजी जन्मलेले प्रतीक हे मुलायम सिंह आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र होते.
 
 
राजकीय कुटुंबात जन्म घेऊनही प्रतीक यादव यांनी सक्रिय राजकारणापासून नेहमीच अंतर राखले होते. लखनऊमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील लीड्स विद्यापीठातून व्यवस्थापनाची (MBA) पदवी संपादन केली होती. उच्च शिक्षणानंतर त्यांनी कौटुंबिक वारसा असलेल्या राजकारणात येण्याऐवजी फिटनेस आणि व्यवसाय क्षेत्रात आपले नशीब अजमावले. लखनऊमध्ये त्यांनी एक अत्याधुनिक जिम सुरू केली होती आणि सोशल मीडियावर ते आपल्या वर्कआउटचे व्हिडिओ शेअर करत तरुणांना तंदुरुस्तीसाठी प्रेरित करत असत. फिटनेससोबतच त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातही आपला व्यवसाय विस्तारला होता. त्यांच्या पश्चात पत्नी अपर्णा यादव आणि दोन मुली असा परिवार आहे.