सप्तद्वीप आणि सप्तसागर!

    दिनांक :13-May-2026
Total Views |
Saptadwipa and Saptasagar आपल्या विविध पुराणानुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. त्यात आपली पृथ्वी महत्त्वाचा घटक आहे. श्रीमद्भगवत महापुराण, विष्णू, वराह, मार्कंडेय पुराणात याबाबत उल्लेख आहेत. या पृथ्वीचे सात द्वीप आणि सप्तार्णव कसे निर्माण झाले याची कथाही पुराणात आली आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस रात्र होतात. स्वायंभुव मनुपुत्र राजे प्रियव्रत यांना पृथ्वीवर अर्ध्या भागात प्रकाश त्याच वेळी अर्ध्या भागात अंधार ही गोष्ट खटकली आणि पृथ्वीवर कुठेच अंधार नको या हेतूने त्यांनी स्वत:च ज्योतिर्मय रथ तयार करून प्रतिसूर्याप्रमाणे ज्या भागावर अंधार तिथे उजेड निर्माण करण्यासाठी आपला रथ नेत सात फेऱ्या मारल्या. त्यामुळे त्याच्या रथाच्या चाकाने सात प्रचंड चाकोल्या आणि खड्डे पडले. ते सात खड्डे म्हणजे सप्तार्णव अर्थात सप्त सागर. त्यामुळे समुद्राने वेढलेले सात भूभाग पडले. त्यांना द्वीप म्हणू लागले. ते द्वीप राजा प्रियव्रताने आपल्या सात पुत्रांना वाटून दिले. विष्णुपुराणातील पुढील श्लोकात त्यांची नावे आहेत.
 

Saptadwipa and Saptasagar 
 
जम्बू-प्लक्ष-शाल्मलि-कुश-क्रौञ्च- शाक-पुष्कर-नामानि, सप्त-द्वीपाः पृथिव्याः, ते सप्त-सागर-परिवेष्टिताः। ते सप्त सागर आणि सप्त द्वीप आजही आहेत. जंबुद्वीप, प्लक्षद्वीप, शाल्मलीद्वीप, कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाकद्वीप आणि पुष्कर द्वीप ही ती सप्तद्वीपांची नावे आहेत. यामुळे निर्माण झालेले सप्त समुद्र पुढील श्लोकातून लक्षात येतील.
 
लवण: क्षीरसमुद्रश्च, सुरोदधि: ससर्पिष: । दधिसमुद्र:, क्षीरसमुद्र:, स्वादुदकस्तथैव च ।।
खाऱ्या पाण्याचा लवण सागर, ऊसाच्या रसासारख्या पाण्याचा इक्षू सागर, मदिरेसारख्या पाण्याचा सुरा सागर, तुपासारख्या पाण्याचा घृत सागर, दह्यासारख्या पाण्याचा दधि सागर, दुधासारख्या पाण्याचा क्षीर सागर, गोड पाण्याचा स्वादु जल किंवा शुद्धोदक सागर. सप्त सागरांच्या वेढ्यामुळे आपण पृथ्वीला ‘सप्तद्वीप वसुंधरा’’ म्हणतो.
 
1) पौराणिक द्वीपानुसार सप्त द्वीपांपैकी सर्वांत प्रथम द्वीप म्हणजे जंबुद्वीप. प्रियव्रतांनी हा द्वीप आपला पुत्र अग्निध्र याला दिला. ज्यामध्ये देवभूमी अखंड भारत, आशिया खंडातील भूभाग येतो. जंबुद्वीप लवण सागराने वेढलेला प्रदेश आहे. सर्व द्वीपांच्या हृदयस्थानी म्हणजे मध्यभागी असलेला हा द्वीप एक लक्ष योजने असा विस्तार असलेला आकाराने कमलदलासारखा आहे. एक लक्ष योजन भूभाग राजा अग्निध्र यांनी आपल्या नऊ पुत्रांना नऊ समान भागात विभाजित करून वाटून दिले. ज्याला पुराणात नऊ वर्ष म्हटले. त्यांच्या पुत्रांच्या नावावरून भारत वर्ष, हरी वर्ष, भद्राश्व वर्ष, केतुमाल वर्ष इत्यादी भाग पडले. आपण राजा अग्निध्र यांनी त्यांच्या ज्येष्ठ पुत्र भारताला दिलेल्या भारत वर्षात राहतो. भारतवर्ष जांबुद्वीपाचा नववा भाग आहे. भरतवर्षे, भरतखंडे, जंबुद्वीपे, दंडकारण्ये असे आपण संकल्पात म्हणतो.
 
जंबुद्वीपातील प्रत्येक वर्षात एक पर्वत आहे. जसे हिमाद्री, गंधमादन, निलगिरी, सुमेरू इत्यादी. या द्वीपांवर जंबू वृक्ष म्हणजे जांभळाची झाडे इतक्या विपुल प्रमाणात होती की ती फळे नदीत पडून ते पाणी जांभूळ रसासारखे होऊन त्या नदीला जंबू नदी नाव पडले. म्हणून हा जंबुद्वीप. या द्वीपाला सुदर्शन द्वीप असेही म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, सध्याचा आशिया खंड म्हणजे जंबुद्वीप आणि इथला लवण सागर म्हणजे अरबी समुद्र आहे.
 
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ।।
 विष्णुपुराणात भारतवर्षाचा उल्लेख आहे.
 
2) यातील दुसरा द्वीप प्लक्षद्वीप असून तो पौराणिक इक्षुरससागराने वेढला आहे. जंबुद्वीपापेक्षा दुप्पट मोठा म्हणजे दोन लक्ष योजने विस्तारित हा द्वीप राजा प्रियव्रताने आपला पुत्र वपुष्मान याला दिला होता. त्याने आपले सात पुत्र गोमेद, ऋषभ, वैभ्राज, सोमक इत्यादींना वाटून दिला. त्यांच्या नावावरूनच त्या त्या भागाला गोमेद वर्ष, ऋषभ वर्ष अशी नावे पडली. प्रत्येक वर्षात एक मोठी नदी होती. अमृता, शिखी, अनुतप्ता इत्यादी त्यांची नावे असून या प्रदेशात प्लक्ष वृक्षाची म्हणजे पारस पिंपळ वृक्षाची अरण्ये होती म्हणून याला प्लक्षद्वीप संबोधित असत. तज्ज्ञांच्या मते, दक्षिण अमेरिका खंड प्लक्षद्वीप तर इक्षुरस सागर म्हणजे अटलांटिक समुद्र आहे.
 
3) पुढील द्वीप शाल्मली द्वीप. शाल्मल म्हणजे काटशेवर वृक्ष ज्याच्या फळातून रेशमी कापूस निघतो. ही झाडे अधिक असल्यामुळे याला शाल्मली द्वीप म्हणतात. प्रियव्रताचे पुत्र यज्ञबाहू यांच्या वाट्याला आलेला हा प्रदेश त्यांनी त्यांच्या सात पुत्रांना वाटून दिला. त्यांच्या नावावरूनच या भागांना सुरोचन वर्ष, रमणक वर्ष, आप्यायन वर्ष अशी नावे पडली. सात प्रदेशांत अनुमती, कुहू, रजनी, नंदा इत्यादी सात नद्या तर शतशृंग, कुंद, मुकुंद, स्वरस इत्यादी पर्वतांची नावे आहेत. हा द्वीप पौराणिक सूरासागराने वेष्टित आहे. तज्ज्ञांच्या मते ऑस्ट्रेलिया खंड आणि सूरासागर म्हणजे पॅसिफिक महासागर होय.
 
4) पुढील द्वीप कुशद्वीप असून हा प्रदेश कुश नावाच्या गवताने आच्छादित होता म्हणून कुशद्वीप. हा द्वीप पौराणिक घृतसागराने अधिक वेढला गेला. प्रियव्रत राजाचे पुत्र हिरण्यरेत यांच्या वाट्याला आला होता. त्यांनी या द्वीपाचे सात भाग म्हणजे सातवर्ष आपल्या सात पुत्रांना वाटून दिले. त्यामुळे या द्वीपाचे वसुवर्ष, विविक्त वर्ष, वसू वर्ष, नाभिगुप्त वर्ष इत्यादी भाग असून त्या प्रत्येक वर्षात एक पर्वत नामे चक्र, चित्रकूट, देवानिक इत्यादी आणि एक नदी-देवगर्भा, मंत्रमाला, मधुकुल्या इत्यादी नद्या होत्या. सध्याचा अंटार्क्टिका खंड हा भाग असून घृतसागर म्हणजे कॅप्सियन समुद्र होय.
 
5) पुढील द्वीप म्हणजे क्रौंच द्वीप. क्रौंच पक्ष्यांचे इथे प्रचंड प्रमाणात वास्तव्य असून पौराणिक दधीसागर किनाèयावर हा द्वीप आहे. राजा प्रियव्रताने आपला पुत्र घृतपृष्ठ याला आणि त्यांनी आपले सात पुत्र मेघपृष्ठ, सुधामा, मधुरूह, लोहितार्ण इत्यादींना वाटून दिल्यामुळे त्यांच्याच नावे सप्तभाग म्हणजे सप्त वर्ष आहेत. या प्रत्येक वर्षात एक अशा अभया, तीर्थवती, पवित्रवती, आर्यका अशा नद्या तर सर्वतोभद्र, नंद, नंदन, वर्धमान अशी पर्वतांची नावे आहेत. सध्याचा आफ्रिका खंड आणि दधीसागर म्हणजे हिंदमहासागर हा भाग आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.
 
6) पुढील द्वीप आहे शाकद्वीप. क्षीरसागराने वेढलेला हा द्वीप शाक म्हणजे सागवान वृक्षांचा प्रदेश. इथे राहणाèयांना शक म्हणतात म्हणून द्वीपाचे नाव शाकद्वीप आहे. राजा प्रियव्रताने आपला पुत्र मेघातिथी याला आणि त्याने आपले सात पुत्र पुरोजव, मनोजव, पवामान, धूम्राणिक इत्यादींना वाटून दिल्यामुळे त्यावरून तेथील वर्ष आहेत.Saptadwipa and Saptasagar प्रत्येक वर्षात एक प्रमुख नदी जसे अनघा, निजधृती, पंचपदी, अपराजिता इत्यादी आणि प्रत्येक वर्षात एक पर्वत ईशान, उरूशृंग, देवपाल इत्यादी पर्वत आहेत. तज्ज्ञांच्या मते, युरोप खंड म्हणजे हा भाग आणि क्षीरसागर म्हणजे बाल्टिक सागर आहे.
 
7) सातव्या द्वीपाचे नाव आहे पुष्कर द्वीप. लक्षावधी पाकळ्यांच्या कमळासारखा दिसतो म्हणून हा पुष्कर द्वीप. पौराणिक स्वादुजल सागराचा हा प्रदेश. प्रियव्रत राजाने हा प्रदेश वितिहोत्र नावाच्या पुत्राला दिला. त्याने आपल्या दोन पुत्रांना रमणक आणि धातकी यांना समान वाटून दिला. पुष्कर द्वीपावर एक महाप्रचंड उंच मानसोत्तर पर्वत आहे. त्यामुळे या द्वीपाचे दोन नैसर्गिक भाग पडतात. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन याच पर्वतामुळे पडले अशी धारणा आहे. सध्याचा उत्तर अमेरिका खंड म्हणजे पुष्करद्वीप आणि स्वादुजल म्हणजे आर्क्टिक महासागराचा भाग आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.
 
आपली पुराणे, रामायण, महाभारत ‘इतिहासं पुरातनम्’ म्हणून साक्ष आहेत. दिलीपराजे, रघुराजे त्यानंतर भगवान श्रीराम, भीष्म पितामह इत्यादींनी सप्तद्वीपांवर अधिराज्य करून सप्तद्वीपाधिपती चक्रवर्ती सम्राट झाल्याच्या पुराणात नोंदी आहेत.
‘वसुधैव कुटुंबकम्’ ही केवळ पुस्तकातील भावना नसून ती प्रत्यक्षात कृती होती हे सप्तद्वीप समन्वयातून लक्षात येईल.
 
प्रा. दिलीप जोशी