विज्ञानाची मोहोर! प्रयागराजच्या कुशीत सापडली लुप्त सरस्वती!

    दिनांक :13-May-2026
Total Views |
प्रयागराज,
Saraswati in Embrace of Prayagraj पौराणिक कथांमध्ये उल्लेख असलेल्या आणि 'लुप्त' मानल्या जाणाऱ्या सरस्वती नदीच्या अस्तित्वाबाबत आता विज्ञानाने एक मोठा खुलासा केला आहे. हैदराबाद येथील 'सीएसआयआर-नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या संशोधकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयागराजमधील गंगा आणि यमुना नद्यांच्या दरम्यान एका विशाल प्राचीन नदीचा (पेलियो रिवर) शोध लावला आहे. या शोधामुळे गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमाबाबत असलेल्या पौराणिक मान्यतांना आता भक्कम वैज्ञानिक आधार मिळाला आहे.
 

Prayagraj 
हिमालय आणि पश्चिम भारतापर्यंत विस्तार
संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, जमिनीखाली दडलेले हे नदीपात्र तब्बल ४ ते ५ किलोमीटर रुंद असून त्याचा आकार आणि खोली गंगा व यमुना नद्यांइतकीच मोठी आहे. हे पात्र म्हणजे केवळ गंगा किंवा यमुनेचा बदललेला मार्ग नसून ती एक स्वतंत्र नदी असल्याचे सिद्ध झाले आहे. सुरुवातीला ४५ किमी लांबीच्या पात्राची माहिती मिळाली होती, मात्र 'नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा'च्या मदतीने केलेल्या पाहणीत कानपूरपर्यंत सुमारे २०० किमीपर्यंत हे पात्र पसरलेले असल्याचे दिसून आले आहे. संशोधकांच्या अंदाजानुसार ही प्राचीन नदी पुढे हिमालय आणि पश्चिम भारतापर्यंत विस्तारलेली असू शकते.
 
 
पौराणिक सरस्वती नदीच्याशी साधर्म्य
हे संशोधन केवळ धार्मिक महत्त्वाची पुष्टी करणारे नसून भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या गंगा आणि यमुनेच्या खोऱ्यात भूजल पातळी वेगाने खाली जात असताना, या प्राचीन नदीपात्राचा वापर पावसाचे पाणी भूगर्भात साठवण्यासाठी (ग्राऊंडवॉटर रिचार्ज) केला जाऊ शकतो. या प्रक्रियेमुळे उन्हाळ्याच्या दिवसातही नद्यांचा जलस्तर टिकवून ठेवण्यास आणि भूजलाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. वाढती लोकसंख्या, इमारती आणि विजेच्या तारा यांसारख्या अडथळ्यांनंतरही संशोधकांनी आधुनिक विज्ञानाच्या मदतीने हे यश संपादन केले आहे. या नदीचे मूळ स्थान, तिचे स्वरूप आणि संगमाजवळील तिचे अस्तित्व हे पौराणिक सरस्वती नदीच्या वर्णनाशी कमालीचे साधर्म्य दर्शवते. त्यामुळे प्रयागराजचा संगम आता केवळ श्रद्धा आणि तीर्थक्षेत्राचे केंद्र न राहता, ते आधुनिक विज्ञान आणि भूगर्भीय संशोधनाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून अधोरेखित झाले आहे.