बोगस बियाणे जप्ती करणाऱ्याचा आ. बकाने यांनी केला सत्कार

    दिनांक :13-May-2026
Total Views |
देवळी,
rajesh-bakane : नाचणगाव परिसरात कृषी विभाग आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तरित्या राबविलेल्या धडक कारवाईत तब्बल १८ लाख रुपये किमतीचे प्रतिबंधित बियाणे जप्त करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी धाडसी व प्रभावी कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि पोलिसांचा आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते सिद्धेश्वर देवस्थान, नाचणगाव येथे सत्कार करण्यात आला.
 
 
LKJL
 
 
 
यावेळी आमदार राजेश बकाने यांनी कृषी विभागाचे जिल्हा मोहिम अधिकारी संदीप ढोणे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रमोद पेटकर, देवळीचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी महेश पालवे तसेच पुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
 
 
याप्रसंगी बोलताना आमदार राजेश बकाने म्हणाले की, "प्रतिबंधित बियाणे, बनावट खत आणि कृषी क्षेत्रातील अवैध व्यवसायामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी विभाग आणि पोलिस प्रशासनाने वेळेत कारवाई करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान वाचविले असून ही कारवाई कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही."
 
तसेच भविष्यातही अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कठोर नजर ठेवून सातत्याने कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शासन आणि प्रशासनाने प्रामाणिकपणे काम केल्यास शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही आमदार बकाने यांनी नमूद केले.
 
 
या कार्यक्रमाला देवळी तहसीलदार समर्थ क्षीरसागर, देवळी नगरपरिषदेचे नगरसेवक संतोष भोयर, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद माहुरे, माजी उपसभापती किशोर गव्हाळकर, भाजपा मंडळ अध्यक्ष जयश्री मोकदम, प्रभाकर ढोक, शुभांगी कासार, गजानन राऊत, श्रीकांत बोबडे, प्रेम साहू, राहुल गायकवाड, निलिमा गावंडे, विस्तार अधिकारी बिडवाईक, ग्रामविकास अधिकारी लोखंडे यांच्यासह नाचणगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी कृषी विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत करत शेतकऱ्यांच्या हितासाठी अशाच धडक मोहिमा सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.