सेलू येथे लवकरच होणार उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय

गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांचा पुढाकार जिल्हा पोलिस दल होणार गतीमान

    दिनांक :13-May-2026
Total Views |
वर्धा, 
Selu Sub Divisional Police Officer Office पोलिस विभागातील वर्धा उपविभागातील पोलिस ठाण्यांची वाढलेली संख्या व वाढता कामाचा बोजा लक्षात घेऊन राज्याचे गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकरामुळे सेलू येथे लवकरच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय होणार आहे. या संदर्भात मंगळवारी मुंबई येथे गृह विभागाची बैठक पार पडली. गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पोलिस प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्यात १९ पोलिस ठाणे कार्यरत असून त्यामध्ये सुमारे १७९२ पोलिस अधिकारी व कर्मचारी सेवा बजावत आहेत. या पोलिस ठाण्यांची विभागणी वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि पुलगाव अशा चार उपविभागांमध्ये करण्यात आलेली आहे. त्यापैकी वर्धा उपविभागात वर्धा शहर, रामनगर, सावंगी मेघे, सेवाग्राम, सेलू, सिंदी रेल्वे आणि दहेगाव अशी सात पोलिस ठाणे समाविष्ट आहेत.
 
 
Selu Sub
 
 
विशेष म्हणजे, वर्धा उपविभागात सन २०२५ दरम्यान भाग १ ते ५ अंतर्गत १०७९ तर भाग ६ अंतर्गत तब्बल २५४४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे आणि विस्तारित प्रशासकीय जबाबदार्‍यांमुळे वर्धा उपविभागीय कार्यालयावर मोठ्या प्रमाणात कामाचा भार निर्माण झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. पंकज भोयर यांनी स्वतंत्र सेलू उपविभाग निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने याबाबत गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्तावानुसार सेलू, सेवाग्राम, सिंदी रेल्वे आणि दहेगाव या चार पोलिस ठाण्यांचा समावेश करून स्वतंत्र सेलू उपविभागीय पोलिस कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. तर वर्धा शहर, रामनगर आणि सावंगी मेघे ही पोलिस ठाणे विद्यमान वर्धा उपविभागातच कायम राहतील. याशिवाय नव्या उपविभागासाठी १ उपविभागीय पोलिस अधिकारी, १ पोलिस उपनिरीक्षक आणि इतर ८ पोलिस अमलदारांच्या पदांना मंजुरी देण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. मंगळवारी या संदर्भातील बैठक मंत्रालयात पार पडली. बैठकीला अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पडवळ, पोलिस उपमहानिरीक्षक मोक्षदा पाटील, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल तसेच गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.