महापौर पदाचा बुरखा आणि चीनसाठी हेरगिरी!

एफबीआयच्या कारवाईनंतर खळबळ

    दिनांक :13-May-2026
Total Views |
लॉस एंजेलिस,
Sensation Following FBI Action अमेरिकेच्या संरक्षण आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कॅलिफोर्निया राज्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्केडिया शहराच्या महापौर आयलीन वांग या चिनी सरकारच्या 'बेकायदेशीर एजंट' म्हणून काम करत असल्याचे एफबीआयच्या (FBI) तपासात निष्पन्न झाले आहे. या खुलाशानंतर अमेरिकन प्रशासनासह संपूर्ण जगात खळबळ उडाली असून, वांग यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा दिला आहे.
 
 

mahila mahapor 
 
एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय आयलीन वांग यांनी २०२० ते २०२२ या काळात चिनी सरकारी अधिकाऱ्यांच्या थेट संपर्कात राहून त्यांच्या इशाऱ्यावरून अमेरिकेत चीनचा अजेंडा राबवला. वांग यांनी "यूएस न्यूज सेंटर" नावाच्या एका संकेतस्थळाचा वापर करून स्थानिक चिनी-अमेरिकन समुदायामध्ये चीन समर्थक प्रचार केला. विशेष म्हणजे, चीनमधील अधिकारी त्यांना 'वीचॅट' ॲपद्वारे बातम्यांचे लेख पाठवत असत, जे अमेरिकेत प्रसिद्ध करून लोकांची मते कलुषित करण्याचा प्रयत्न केला जात होता. चिनी सरकारच्या या छुपे मोहिमेत त्यांना याओनिंग "माइक" सन नावाच्या व्यक्तीचीही साथ लाभली होती.
 
 
नोव्हेंबर २०२२ मध्ये आर्केडिया सिटी कौन्सिलवर निवडून आलेल्या वांग यांनी महापौर पदापर्यंत मजल मारली होती. मात्र, एका परदेशी सरकारसाठी गुप्तपणे काम करणारी व्यक्ती अमेरिकेच्या सार्वजनिक आणि घटनात्मक पदावर पोहोचल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. फेडरल कोर्टात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी वांग यांनी आपली चूक कबूल केली असून, त्यांना आता १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अमेरिकेच्या न्याय विभागाने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, हा अमेरिकन लोकशाहीवर प्रभाव टाकण्याचा आणि तिला भ्रष्ट करण्याचा चीनचा एक गंभीर प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. परदेशी सरकारांच्या इशाऱ्यावर अमेरिकेच्या व्यवस्थेत घुसखोरी करणाऱ्यांसाठी ही कारवाई एक मोठा इशारा मानली जात आहे. सध्या वांग यांना लॉस एंजेलिसमधील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असून, आगामी काही आठवड्यांत या प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे.