विजय निचकवडे
‘Summer’ Camp जे सगळे करतात, तेच आपण करायचं ही आमची मानसिकता! शेजारची लेकरं म्हणे मोठे पैसे भरून उन्हाळी शिबिराला जातात. समर कॅम्प असे त्याचे नाव! म्हणून मग आमच्याही मुलाने जावं, असा आग्रह असतो. पण या आग्रहात ‘त्या’ मुलाचं भविष्य असते का हो? असे असताना आजही या मायाजाळात युवा पिढीत ग्रामीणसह शहरी भागात संस्कार रुजविण्याचे काम करताहेत, वारकरी घडविणारे बाल संस्कार शिबिरे. समर कॅम्पच्या तुलनेत याचा गजावाजा नसतो, पण माणूस म्हणून पिढी तयार करण्याची क्षमता अपार असते.
आज समाजात वावरताना आपण जे पाहतो, ते चित्र विदारक आहे. घरातून मिळणारे संस्कार संपत चालले आहेत. पैसा मिळविण्याच्या नोकरीनिमित्त घराबाहेर राहणारे आई-वडील, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात दिसत नसलेले आजी-आजोबा हरविलेल्या संस्काराचे कारण आहे. मुलं मोबाईलच्या आहारी गेले आहेत. माध्यमे त्याच्यासाठी संस्काराची पेटी झाली असून माध्यमातील पात्र त्यांचे आदर्श ठरू पाहात आहेत. यातूनच संस्कार पाझरू लागले आणि पिढी नको त्या मार्गाने निघाली. लहान लहान मुलेच नव्हे, मुलीसुद्धा व्यसनाच्या गेल्या. मानसन्मान, वडीलधार्यांचा आदर, आमची संस्कृती, देशभक्ती ही पिढी विसरली आणि आज संस्कार रुजविण्याची गरज निर्माण झाली. महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या विचारांचा सुगंध आहे आणि या सुगंधाचा खरा वारसदार म्हणजे आपली ‘युवा पिढी.’ आजच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात जेव्हा संस्कारांची जपणूक करणे कठीण झाले आहे, तेव्हा ‘वारकरी बाल संस्कार शिबिरे’ आशेचा किरण म्हणून समोर आली आहेत. आज गावागावांत वारकरी बाल संस्कार शिबिरांचं आयोजन होत आहे. कुठे गुरुदेव सेवा मंडळ असेल ते कुठे आणखी कुठल्या संस्थेचा पुढाकार. सगळ्यांचा हेतू एकच आणि स्पष्ट; तो म्हणजे संस्कारक्षम पिढी घडविणे. तिथे स्वीमिंग पूल नसतो. आधुनिक साधनांचा सहवास नसतो, ना आरामदायी वातावरण. पण तेथे हरिनामापासून ते शुभंकरोतीपर्यंतची दिनचर्या समर कॅम्पमधील आधुनिकतेलाही मागे टाकून जाते.
‘देह जावो अथवा राहो’ पांडुरंगी दृढ भावो’
हा विचार केवळ अभंगापुरता मर्यादित नसून तो जगण्याचा एक मार्ग आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे वारकरी संप्रदायाने केवळ भक्तीच शिकवली नाही, तर माणुसकी आणि संस्कारांचे धडे दिले आहेत. आजच्या विज्ञानाच्या आपली युवा पिढी जागतिक स्तरावर प्रगती करीत असताना, त्यांना आपल्या मुळांशी जोडून ठेवण्याचे काम वारकरी बाल संस्कार शिबिरे अत्यंत प्रभावीपणे करीत आहेत. वारकरी बाल संस्कार शिबिर म्हणजे केवळ टाळ-मृदंगाचा सराव नव्हे, तर ती एक जीवन जगण्याची कार्यशाळा आहे. येथे शिस्त, नीतिमत्ता आणि सामाजिक जबाबदारी यांचे बाळकडू दिले जाते. मुलांमध्ये नियोजन आणि शिस्त निर्माण करते. ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत धर्माच्या तत्त्वांचे सोप्या भाषेत केलेले विवेचन मुलांना आपल्या समृद्ध परंपरेची ओळख करून देते. आजच्या काळात पालकांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे मुलांना व्यसनांपासून आणि विघातक प्रवृत्तींपासून दूर ठेवणे. वारकरी शिबिरे यावर रामबाण उपाय ठरत आहेत. लहानपणापासूनच सात्त्विक आहार आणि सवय लागल्यामुळे ही मुले कोणत्याही चुकीच्या मार्गाला जाण्याचा प्रश्नच नसतो.
‘तुका म्हणे जे जे भेटे, ते ते मानिजे दैवत’
‘Summer’ Camp या उक्तीप्रमाणे प्रत्येक माणसात देव पाहण्याची दृष्टी या शिबिरात मिळते. संस्कार हे केवळ मानसिक नसून ते एक प्रकारचे संरक्षणदेखील आहेत. ज्या मुलाचे विचार शुद्ध असतात, त्याचे आचरण कधी भरकटत नाही. धारणा आणि नामस्मरणामुळे मुलांची एकाग्रता वाढते. ताणतणावाच्या काळात खचून न जाता धैर्याने सामोरे जाण्याचे बळ वारकरी विचार देतात. शिबिरातून बाहेर पडलेला युवक हा समाजाचा एक जबाबदार घटक असतो. तो पर्यावरणाचे रक्षण करतो, गरजूंना मदत करतो आणि स्त्रीशक्तीचा सन्मान करतो. हेच खर्या अर्थाने समाजाचे संरक्षण आहे.
वारकरी असणे म्हणजे जुनाट असणे नव्हे; उलट वारकरी विचार हे जगातील सर्वात प्रगत विचार आहेत, जे समता, बंधुता आणि प्रेमाची शिकवण देतात. एकूणच, वारकरी बाल संस्कार शिबिरे ही भविष्यातील ‘आदर्श नागरिक’ घडविणारी टांकसाळ आहे. ही केवळ धार्मिक केंद्रे नसून ती राष्ट्र निर्मितीची केंद्रे आहेत. आज आपल्या मुलांच्या हातात लहानपणीच या संस्कारांची ‘पताका’ दिल्यास आपल्या पिढीबद्दल चिंता आणि पश्चात्ताप करण्याची वेळच आपल्यावर येणार नाही, हे नक्की!
९७६३७१३४१७