श्याम पांडे,
दारव्हा,
bhairuji-maharaj-path-festival : आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणूस प्रगतीच्या शिखरावर पोहोचला असला, तरी नात्यांमधील जिव्हाळा आणि एकत्र कुटुंब व्यवस्थेची उब अनेक ठिकाणी कमी होताना दिसते. या काळात दारव्हा येथील सिंगी परिवाराने जपलेली श्री भैरुजी महाराज पाठ उत्सवाची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या सिंगी परिवाराचे नाव केवळ सामाजिक, धार्मिक किंवा व्यापारी क्षेत्रापुरते मर्यादित नाही, तर संस्कार, एकता आणि नातेसंबंध जपणारा परिवार म्हणूनही मोठ्या आदराने घेतले जातेे. राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील पिपाड परिसरातून फार पूर्वी, म्हणजे 1884 मध्ये जवाहरमल सिंगी आणि सुखराज सिंगी दारव्हा येथे आले. त्यांनी येथे आपल्या परिवारासोबत संस्कृती, परंपरा आणि कुलदैवत श्री भैरुजी महाराज यांच्यावरील श्रद्धेची पायाभरणी केली.
पुढील पिढ्यांनीही ही परंपरा केवळ जपली नाही, तर ती अधिक समृद्ध केली. आज दारव्हा येथे सिंगी परिवाराची सातवी पिढी कार्यरत असून परिवारातील सदस्य नागपूर, पुणे, यवतमाळ तसेच विविध शहरांत स्थायिक झाले असले, तरी त्यांना जोडून ठेवणारा धागा म्हणजे श्री भैरुजी महाराज पाठ उत्सव.
दरवर्षी 30 एप्रिल आणि 1 मे असे दोन दिवस होणारा हा उत्सव आता संपूर्ण सिंगी परिवारासाठी वार्षिक कौटुंबिक मिलन सोहळा बनला आहे. वर्षभर व्यवसाय, नोकरी, शिक्षण आणि जीवनाच्या धावपळीत व्यस्त असलेले परिवारातील सदस्य या निमित्ताने एकत्र येतात. मुली माहेरी येतात, जावई प्रेमाने सहभागी होतात, नातवंडांचा आनंद घरभर दरवळतो आणि वडीलधाèयांच्या चेहèयावर समाधान झळकते.
हा उत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण परिवारासाठी जीवनातील प्रेमळ आणि अविस्मरणीय क्षण जगण्याची एक सुंदर संधीच असते. जणूकाही वर्षभराचा रिचार्जच मारला जातोे. एकमेकांच्या सुखदुःखांची विचारपूस, जुन्या आठवणींना उजाळा, नव्या पिढीची ओळख, मुलांमधील आपुलकी आणि परिवारातील आत्मीयता या सर्व गोष्टी या दोन दिवसांत नव्याने फुलताना दिसतात.
विशेष म्हणजे, कुलदैवत श्री भैरुजी महाराजांची पूजाअर्चा या परिवाराला एका सूत्रात बांधून ठेवणारे सर्वात मोठे आणि समर्थ माध्यम ठरले आहे. धार्मिक श्रद्धेच्या माध्यमातून परिवारातील सर्व सदस्य वर्षातून एकदा एकत्र येतात आणि नात्यांमध्ये नव्याने प्रेम, जिव्हाळा आणि संवाद निर्माण होतो.
या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण परिवाराची वंशवेल या निमित्ताने एकत्र येते. परिवारातील ज्येष्ठ सदस्य, मुली, जावई, नातवंडे, भाचे, पुतणे आणि लहान मुले असे दीडशेहून अधिक लोक एकाच छताखाली जमा होतात, दरवर्षी..! या भेटीत केवळ औपचारिकता नसते, तर प्रेम, माया, आत्मीयता, जिव्हाळा आणि आपुलकी यांचा सुंदर संगम असतो.
आजच्या आधुनिक जीवनशैलीत कौटुंबिक संवाद हरवत चालला आहे. मोबाईल आणि समाज माध्यमांमुळे माणसे जोडली गेली असली, तरी मनामनांतील अंतर वाढताना दिसते. अशा स्थितीत सिंगी परिवाराने जपलेली ही परंपरा अत्यंत महत्त्वाचा संदेश देणारी आहे. कारण अशा कौटुंबिक मिलनातून दुरावलेली मने पुन्हा जवळ येतात, गैरसमज दूर होतात आणि आपण एक आहोत ही भावना अधिक दृढ होते.
भारतीय संस्कृतीतील ‘एकत्र कुटुंब : सुखी परिवार’ ही संकल्पना समाजाची ताकद होती. आजच्या युगातही ती तितकीच आवश्यक आहे आणि सिंगी परिवाराने ती आपल्या कृतीतून जिवंत ठेवली आहे. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता संस्कार, प्रेम, एकता आणि भारतीय कुटुंब व्यवस्थेचा जिवंत आदर्श ठरत आहे. सिंगी परिवार या उत्सवाची आतुरतेने वाट पहात असतो.