१० हजारांची लाच घेताना दोघे जाळ्यात

एसीबी अधिकाऱ्यांच्या समोरून एक आरोपी फरार

    दिनांक :13-May-2026
Total Views |
जळगाव जामोद,
Two caught while taking bribe येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात लाच घेणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर बुलढाणा लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (१२ मे) मोठी कारवाई केली. मात्र, या कारवाईनंतर एका आरोपीने पोलीस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. वडिलांच्या नावावर असलेल्या भूखंडाच्या मोजणीतील त्रुटी दूर करून मोजणी लवकर करून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच मागणे या कर्मचाऱ्यांना महागात पडले आहे.
 
 
 
Two caught while taking bribe
तक्रारदाराने आपल्या वडिलांच्या भूखंडाची शासकीय मोजणी करण्यासाठी १९ जानेवारी २०२६ रोजी रीतसर ऑनलाइन अर्ज केला होता. या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते १७ मार्च रोजी भूमापक विश्वजीत विनायक सोनोने यांना भेटले. सोनोने यांनी अर्जात त्रुटी असल्याचे सांगून त्या काढण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याप्रकरणी एसीबीकडे धाव घेतली असता, पडताळणी दरम्यान कार्यालयीन सहाय्यक सचिन सदाशिव वाजपे यांनीही ही लाच देण्याचा सल्ला तक्रारदारास दिला. अखेर मंगळवारी सापळा रचून एसीबीने १० हजार रुपये स्वीकारताना सोनोने आणि वाजपे या दोघांना रंगेहात पकडले.
 
 
 
या कारवाईनंतर दोघांनाही जळगाव जामोद येथील स्थानिक विश्रामगृहात नेण्यात आले होते. तिथे सोनोने याने शिताफीने विश्रामगृहाच्या स्वयंपाकघरातून धूम ठोकली. विशेष म्हणजे, एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आरोपी पळून गेल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे, दुसऱ्या आरोपीला सोडवण्यासाठी काही वरिष्ठ स्तरावरून दबाव येत असल्याची चर्चा रंगली होती, मात्र जागरूक पत्रकारांमुळे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. लाचलूचपत विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये आरोपी पळाल्याचा उल्लेख नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदर कारवाई अमरावती आणि बुलढाणा विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास घुशिंगे आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली. सध्या पसार झालेल्या आरोपीचा शोध घेतला जात असून, दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.