मुंबई,
Uday Kotak expressed concern मध्यपूर्वेतील इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, प्रख्यात उद्योगपती आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. धक्का बसण्याची वाट पाहण्यापेक्षा, कठीण काळाचा सामना करण्यासाठी आपण आधीच तयार असायला हवे, अशा शब्दांत त्यांनी भारतीयांना सावध केले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विस्कळीत होत असलेला जागतिक पुरवठा यामुळे आगामी काळात आर्थिक चटके बसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.'कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री' (CII) च्या कार्यक्रमात बोलताना कोटक यांनी भारताच्या आर्थिक आत्मनिर्भरतेवर भर दिला. ते म्हणाले की, भारताने परकीय भांडवलावरील आपले अवलंबित्व कमी करून देशांतर्गत जोखीम भांडवलाचा मजबूत साठा निर्माण करणे काळाची गरज आहे. सध्या इंधनाच्या किमतींवर मोठा परिणाम दिसला नसला, तरी जागतिक परिस्थिती कधीही बिघडू शकते. अशा वेळी देशाला कोणत्याही आर्थिक धक्क्यापासून वाचवण्यासाठी अंतर्गत पाया मजबूत करणे आवश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना पुढील वर्षभर सोनं खरेदी टाळण्याचे आणि परदेश दौरे न करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाचे पडसाद आता उद्योगजगतातही उमटताना दिसत आहेत. उदय कोटक यांनी कंपन्यांना केवळ त्रैमासिक नफा किंवा शेअर बाजारातील किमतींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, पुढील तीन ते पाच वर्षांचा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून व्यवसाय उभारण्याचा सल्ला दिला आहे. अनेक कंपन्या सध्या केवळ 'कॉर्पोरेट ट्रेझरी' चालवण्यावर भर देत आहेत, मात्र त्याऐवजी नफ्याची पुनर्गुंतवणूक करून उत्पादन क्षमता वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कोटक यांनी सरकारलाही धोरणात्मक बदलांच्या सूचना केल्या आहेत. केवळ विद्यमान कर सवलतींवर अवलंबून न राहता, नवीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त गुंतवणूक भत्ते दिले पाहिजेत, असे त्यांनी सुचवले. कोरोनानंतर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी बाजारात मोठी भूमिका बजावली असली, तरी जागतिक स्तरावरील विस्कळीत वातावरण भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने आणि कॉर्पोरेट जगताने 'सर्वात वाईट' परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासूनच सज्ज राहणे हिताचे ठरेल.