वरोडा,
Unauthorized HTBT Kapus तालुक्यातील शेगाव बु. येथे अनधिकृत व संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्याची साठवणूक करून विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई कृषी विभागाच्या भरारी पथकाने केली असून, आरोपीकडून एकूण 96 पॅकेट कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शेगाव पोलिस ठाण्यात बुधवार, 13 मे रोजी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.याबाबत वरोडा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) मारोती वरभे यांनी शासनाच्या वतीने तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मे 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे भरारी पथकाने शेगाव बु. येथील मीतेश किशोर पारोधे याच्या घरी धाड टाकली. यावेळी निखील वाढई व रवींद्र दडमल या पंचाच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. तपासादरम्यान ‘छावा’ नावाच्या बॅगमध्ये 46 पॅकेट तर ‘ट्रस्ट’ नावाच्या बॅगमध्ये 50 पॅकेट संशयास्पद एचटीबीटी बियाणे आढळले. सर्व पॅकेट प्रत्येकी 450 ग्रॅम वजनाचे असून, एकूण 96 पॅकेट बियाण्यांची किंमत 86 हजार 496 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तपासादरम्यान आरोपी मीतेश किशोर पारोधे (रा. गांधी वॉर्ड, शेगाव बु.) याने हे बियाणे वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील टेकाडे यांच्याकडून मिळाल्याचे सांगितले. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांवर उत्पादक, विक्रेता, गुणवत्ता व मान्यता याबाबत आवश्यक माहिती नव्हती. तसेच जीइएसी मान्यतेचा उल्लेख नसल्याचेही आढळले. त्यामुळे शेतकर्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर साठवणूक व विक्री केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मीतेश पारोधे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक एस. टी. पवार, मोहीम अधिकारी लंकेश कटरे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक श्रावण बोडे, कृषी अधिकारी गजानन हटवार सहभागी होते.
कापूस बियाण्यांच्या वाहतूकप्रकरणी दोघांना अटक
गोंडपिपरी : तालुक्यात प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणांची बेकायदेशीर वाहतूक करणार्यांवर कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केली. मंगळवारी तालुक्यातील वढोली ते विठ्ठलवाडा येथून अनधिकृत कापूस बियाण्यांची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक पोलिस व कृषी विभागाला मिळाली. यावरून त्या ठिकाणावर नाकाबंदी केली. दरम्यान समोरून येणार्या संशयित दुचाकीला थांबवून तपासणी केली असता, एका प्लास्टिक बोरीत प्रत्येकी 450 ग्रॅम वजनाचे 60 पॉकेट संशोधित हायब्रीड कपास बीज आढळून आली. या प्रकरणात पोलिसांनी 60 हजार रुपये किंमतीचे बियाणे व 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, राजेंद्र ठेंगणे (40), प्रकाश ताजने (51) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ठाणेदार रमेश हत्तीगोटे, तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे आदींनी केली.