वॉशिंग्टन,
United States spent 2.77 lakh crore इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसून या संघर्षात अमेरिकेने आतापर्यंत खर्च केलेल्या अफाट संपत्तीचा आकडा समोर आला आहे. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, इराणसोबतच्या या लष्करी मोहिमेसाठी अमेरिकेने तब्बल २९ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. कॅपिटल हिलवर झालेल्या अर्थसंकल्पीय सुनावणीदरम्यान ही माहिती देण्यात आली असून, या प्रचंड खर्चामुळे अमेरिकन काँग्रेसमध्ये ट्रम्प प्रशासनाच्या युद्ध धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी हा खर्च २५ अब्ज डॉलर्स असेल असा अंदाज वर्तवला होता, मात्र तो आता २९ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे.

हा आकडा भारतीय चलनात रूपांतरित केल्यास अधिक भीषण वास्तव समोर येते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली असून, एका डॉलरची किंमत ९५ रुपयांच्या पार गेली आहे. या हिशोबाने अमेरिकेने इराणसोबतच्या संघर्षात खर्च केलेली २९ अब्ज डॉलर्सची रक्कम भारतीय चलनात तब्बल २.७७ लाख कोटी रुपयांच्या (२,७७,३२७ कोटी रुपये) घरात जाते. एका बाजूला अमेरिकेची अर्थव्यवस्था या खर्चामुळे दबावाखाली असताना दुसरीकडे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम नाकारत आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.
या सर्व घडामोडींवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून विरोधकांना आणि इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणच्या लष्करी शक्तीचे कौतुक करणाऱ्या बातम्यांना त्यांनी 'देशद्रोह' आणि 'खोट्या बातम्या' संबोधले आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकेच्या कारवाईमुळे इराणचे नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून त्यांची १५९ जहाजे समुद्राच्या तळाशी गेली आहेत. इराणचे हवाई दल आणि तंत्रज्ञान नष्ट झाले असून तो देश आर्थिकदृष्ट्या रसातळाला गेल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या सामर्थ्याबद्दल शंका घेणारे लोक कृतघ्न असल्याचे सांगत त्यांनी इराणला दिलेला शांततेचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांत पुन्हा एकदा मोठ्या युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.